पुरावा मागितल्यास संविधानाची प्रत दाखवा- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 01:50 IST2020-02-03T01:47:36+5:302020-02-03T01:50:36+5:30

‘शाहीन बाग अ‍ॅट कल्याण’च्या आंदोलकांची घेतली भेट

Show a copy of the Constitution if asked for evidence - Jitendra Awhad | पुरावा मागितल्यास संविधानाची प्रत दाखवा- जितेंद्र आव्हाड

पुरावा मागितल्यास संविधानाची प्रत दाखवा- जितेंद्र आव्हाड

कल्याण : आपल्या घरी प्रत्येकाने भारतीय संविधानाची प्रत ठेवावी. तुमच्याकडे सरकारी यंत्रणा काही कागदपत्रे वा पुरावा मागायला आल्या, तर त्यांना संविधानाची प्रत दाखवा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे केले.

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. त्या धर्तीवर कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात महापालिकेच्या मैदानात ‘शाहीन बाग अ‍ॅट कल्याण’ आंदोलन २२ जानेवारीपासून सुरू आहे. शनिवारी आव्हाड यांनी येथे भेट दिली. सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन, अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जव्वाद डोण यांच्या उपस्थितीत ‘हम भारत के लोग’ फोरमतर्फे सुरू असलेल्या आंदोलनात महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सीएए’च्या विरोधात महिला व मुले रस्त्यावर उतरली आहेत. ज्यावेळी एखाद्या आंदोलनाचे नेतृत्व महिला आणि मुले करतात, तेव्हा ते आंदोलन योग्य दिशेने सुरू असल्याचे आव्हाड म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कायद्याच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धर्मात एक भिंत निर्माण करत आहेत. ती तोडण्यासाठी ही आंदोलने होत आहेत.

आसाममध्ये हा कायदा लागू केला, तेव्हा १९ लाख लोकांना पकडले. त्यात १४ लाख हिंदू होते, जे आजही तेथील तुरुंगात पडून आहेत. त्यांच्या मुक्तीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आतापर्यंत चकार शब्दही काढला नसल्याची टीका त्यांनी केली.

नियम बाजूला ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर

शाहीन बाग अ‍ॅट कल्याण या आंदोलनास्थळी आव्हाड वेळेत पोहोचू शकले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिप्रक्षेपक जाहीर कार्यक्रमात सुरू ठेवण्याची परवानगी असते. तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र विक्रोळी आणि मुंब्रा येथील कार्यक्रम आटोपून आव्हाड यांना कल्याणला पोहोचण्यासाठी रात्री ११.१५ वाजले. ११ वाजून २९ मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांचे भाषण ११ वाजून ५४ मिनिटांनी संपले. यावेळी नियम बाजूला ठेवून ध्वनिप्रक्षेपकाचा वापर करण्यात आला.

Web Title: Show a copy of the Constitution if asked for evidence - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.