पार्किंगला जागा दाखवा!
By Admin | Published: December 11, 2015 01:13 AM2015-12-11T01:13:51+5:302015-12-11T01:13:51+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांनी रेल्वे स्थानकाजवळील परिसर मोकळा करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात पार्किंगची विकास योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुरलीधर भवार, कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांनी रेल्वे स्थानकाजवळील परिसर मोकळा करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात पार्किंगची विकास योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र स्टेशन परिसरात महापालिकेला पार्किंगची विकास योजना राबविण्यासाठी जागा कुठे आहे हा प्रश्नच आहे. पार्किंगसाठी स्टेशन परिसरात वाहन तळांची सुविधाच अपुरी असल्याने स्टेशन परिसर मोकळे होणार की, केवळ आयुक्तांची वल्गना ठरणार असे बोलले जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यासाठी विविध पर्याय व कशा प्रकारे शहर स्मार्ट केले जाईल याकरीता आयुक्तांनी अहवाल तयार करायचे काम हाती घेतले आहे. अहवाल तयार करीत असताना नागरिकांना कशा प्रकारे शहर स्मार्ट हवे आहे यासाठी त्यांनी चर्चा केली आहे. समाजातील विविध प्रमुख गटांशी चर्चा करुन पर्याय विचारात घेतले गेले आहे. त्यातून शहरातील इतर प्रमुख समस्यापैकी वाहतूक कोंडी मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी जोपर्यंत दूर होत नाही. तोपर्यंत शहर स्मार्ट होत नाही. या मुद्दा लक्षात घेऊन आयुक्त रविंद्रन यांनी स्टेशन परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहिम हाती घेतली. कल्याणमध्ये अतिक्रमणे सफाई करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरातील पाहणी आयुक्तांनी केली. डोंबिवली स्टेशन स्टेशन परिसरात पार्किंगची विकास योजना राबविण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.
डोंबिवली स्टेशन परिसरात पूर्व भागात इंदिरा गांधी चौक, बाजू प्रभू चौक, राननगर, केळकर रोड, अनुकूल हॉटेल शेजारी, शुभमंगल कार्यालय शेजारी सगळ््याच ठिकाणी प्रमुख चौक रिक्षा स्टॅण्डने व्याप्त आहेत. पश्चिम भागात गुप्ते रोड, फुले रोड, द्वारका हॉटेल या सगळ््याच ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड आहेत. त्या बाजूला आधीच रस्ता अरुंद आहे. त्यात असलेला रस्ता रिक्षा स्टॅण्डने व्याप्त आहे.
कल्याण पश्चिम भागात स्टेशन परिसरात मुख्य स्टॅण्ड, स्कॉय वॉक खाली दिपक हॉटेल, बस डेपो समोर, साधना हॉटेल समोर, शिवाजी चौक, महंमद अली चौक या प्रमुख ठिकाणी रिक्षा स्टॅण्डने जागा व्याप्त केली आहे. रिक्षा स्टॅण्ड शिवाय कल्याण व डोंबिवलीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी बेकायदेशीररित्या पार्किंग केल्या जातात. त्यामुळे स्टेशन परिसर मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कल्याण स्टेशन परिसरात स्टॅटिस सारखा प्रकल्प राबवून देखील स्टेशन परिसरातील कोंडी फुटलेली नाही.
> सहाय्यक पोलिस आयुक्त एस.के. डुबल यांनी सांगितले की, स्टेशन परिसरात पार्किंगची सुविधा अपुरी आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही बाब वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने महापालिकेस वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. विद्यमान आयुक्तांनी स्टेशन परिसर मोकळा करण्याची चांगली मोहीम हाती घेतली आहे. तसेच त्यांनी पार्किंगची योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. सुविधा नसली तरी जी काही उपलब्ध सुविधा आहे. त्याठिकाणी वाहन चालक गाडया पार्क करीत नाहीत. पार्किंगची सवय नागरीकांना नाही ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे.