आयुक्तांचे स्वच्छतेचे उपक्रम दिखाऊ, नगरसेवकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:40 AM2018-01-06T06:40:19+5:302018-01-06T06:40:28+5:30
स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.
उल्हासनगर : स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, स्वच्छता निरीक्षकासह मुकादम, कर्मचारी आदींनी स्वच्छता मोहिमेंतर्गत भाग घेतला.
बुधवारी दुपारी विकास आराखड्याची महासभा संपल्यानंतर शहर स्वच्छ व सुंदर झाल्याची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे आयुक्तांनी महासभा सभागृहात नगरसेवकांना दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरातील प्रत्येक चौकात व विविध ठिकाणी कचºयाचे निळे व हिरवे डबे लोखंडी खांबाला लावले आहेत. तसेच वर्गीकरणाबाबत पालिकेने जनजागृती सुरू केली आहे.
मागील आठवड्यात स्वच्छता अभियानातील महापालिकेची प्रगती व सर्वेक्षण करण्यासाठी केंद्राचे पथक आले होते. त्यांनी दोन दिवस शहराचे सर्वेक्षण केल्यावर पालिकेच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, भारिपच्या गटनेत्या कविता बागुल आदींनी पालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल
केली.
महापालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांना सेफ्टी टँक नसून सफाई कामगार हाताने मैला उचलतात. शहरातील इतर स्वच्छतागृहांची हीच परिस्थिती असल्याची टीका शिवसेनेच्या चौधरी यांनी केली. एकूणच पालिकेत सुरळीत व्यवहार होत नसल्याचेच दिसून येत आहे.
नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा
शहराला पाणीपुरवठा करणाºया जलकुंभाला गळती लागली असून त्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला.
मात्र, आजपर्यंत जलकुंभाची दुरुस्ती केली नसून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याची टीका नगरसेवक भगवान भालेराव यांनी केली.
भाजपाच्या अर्चना करनकाळे, साई पक्षाच्या सविता तोरणे-रगडे यांच्यासह शिवसेना, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला.
शहराची वाटचाल स्वच्छतेकडे
महापालिकेने स्वच्छता अभियानाखाली विविध उपक्रम शहरात राबवले असून ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण हाती घेतले आहे.
तसेच अनेक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून तीन हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे नागरिकांना बांधून दिली.
तसेच स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबवत आहे. कधी नव्हे शून्य कचरा संकल्पना खºया अर्थाने अस्तित्वात येत आहे.
तसेच देशातील स्वच्छता अभियानात ५० शहरांमध्ये उल्हासनगरचा समावेश असेल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.