ठाण्याच्या आयुक्तांवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Published: May 19, 2017 04:00 AM2017-05-19T04:00:38+5:302017-05-19T04:00:38+5:30
मागील १० दिवसांपासून ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरासह जांभळीनाका, घोडंबदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. तिच्या विरोधात नाराजीचा सूर
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील १० दिवसांपासून ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरासह जांभळीनाका, घोडंबदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. तिच्या विरोधात नाराजीचा सूर एकीकडे उमटत असतांना दुसरीकडे आयुक्तांच्या कारवाईचे काही दक्ष ठाणेकरासह सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे. तशी पत्रे पालिका आयुक्तांच्या मेलवर धडक आहेतच, शिवाय लेखी पत्रेही आयुक्तांच्या दालनात येऊ लागली आहेत.
उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांकडून हल्ला झाल्यानंतर गुरुवारी सांयकाळी आयुक्तांनी संतापाच्या भरात येथील २८ गाळे भुईसपाट केले. तसेच फेरीवाल्यांसह स्टेशन परिसरातील रिक्षा चालक, रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणाऱ्यावाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. सलग दहा दिवस ही कारवाई सुरु असून आता खऱ्या अर्थाने स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. रिक्षा चालकांनादेखील शिस्त लागली असून जे रिक्षा चालक एखाद्या प्रवाशावर एकत्रित हल्ला बोल करीत होते, तेच रिक्षा चालक आज काहीसे प्रामाणिक झाल्याचे दिसत आहेत. या भागात कारवाई करतांनाच हिरानंदानी मेडोज, लोकपुरम, कापूरबावडी, मानपाडा, हायपरसिटी मॉल कासारवडवली, मुंब्रा आदी भागातही कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. परंतु, या कारवाई दरम्यान आयुक्तांनी कायदा हातात घेतल्याने त्यांच्या विरोधात एक मतप्रवाह तयार झाला असून अनेकांनी तर त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीचे चित्रण आणि छायाचित्रे पोलीस आयुक्तांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील आयुक्तांच्या या दबंगगीरीचा विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीला कारवाईत आक्रमक असलेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही दिवसांपासून मवाळ भूमिका स्वीकारली आहे. सोशल मिडीया आणि नागरिकांनी थेट आयुक्तांच्या या दबंगगिरीचा निषेध केल्याने आयुक्तांनीच थेट नागरिकांचा चालता फिरता जनता दरबार घेऊन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांनी त्यांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.