घरे तोडल्याच्या निषेधार्थ श्रमजीवीचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:34 AM2019-11-26T01:34:09+5:302019-11-26T01:34:49+5:30
हरितपट्ट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे.
ठाणे : हरितपट्ट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार, भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. हा अन्याय असल्याचा आरोप करून त्याविरोधात शेकडो आदिवासींनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व ठाणे भागातील आदिवासींची घरे तोडली जात आहेत. त्याविरोधात शेकडो आदिवासींनी एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर श्रमजीवीच्या या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उन्हात असलेल्या व्यासपीठावर पंडित यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष आर.सी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या बिºहाड मोर्चात सर्वाधिक संख्येने आदिवासी महिलांचा समावेश आढळून आला. कोंबड्या, बकऱ्या, भांडी आदी घेऊन हा बि-हाड मोर्चा श्रमजीवीने काढला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. असे असताना आज गरिबांची मुलं भुकेने मरत आहेत, यापेक्षा दुर्दैवी काय आहे, असा सवाल पंडित यांनी विचारला. भुकेने मृत्युमुखी पडणाºया जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत, हे आपल्या जगभर फिरणा-या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कातकरी समाज आजही वेदनामय जीवन जगत आहे. कातकरी उत्थान सुरू केले, मात्र सर्व काही फक्त कागदावर आहे. २०२० पर्यंत सर्वांना घर देणारे आता लोकांची घरे झोपड्या तोडत आहेत.
ही तर लोकशाहीची थट्टा मांडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रूपेश म्हात्रे यांनीही मार्गदर्शन करून या अन्यायाविरोधात २७ नोव्हेंबरला भिवंडीतील सर्व गोडाउन बंद करण्याची घोषणा केली. या मोर्चात कार्याध्यक्ष केशव नानकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, रामराव लोंढे, गणपत हिलीम, हिरामण गुळवी, राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रमोद पवार, जया पारधी, संगीता भोमटे, जयेंद्र गावित, गणेश उंबरसडा, उल्हास भानुशाली आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०१५ पर्यंतची बांधकामे नियमानुकूल करा
भिवंडी तालुक्यात प्रथम झालेल्या या कारवाईत आदिवासींचे घरे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. मात्र, भिवंडीतील गोडाउनही तोडण्याचे आदेश असताना त्यावर मात्र कारवाई न करता प्रथम आदिवासींची जुनी व परंपरागत असलेली घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली.
या अन्यायाविरोधात मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच बंद करण्याची मागणी या आदिवासी मोर्चेकऱ्यांनी केली. त्यांच्या या मोर्चाद्वारे आता गोडाउन तोडण्याची कारवाईदेखील थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या मूळच्या आदिवासी, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकºयांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमानुकूल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.