जिल्ह्यात श्रावण सरी बरसल्या, बारवी धरणात १५६ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:07 AM2020-08-16T01:07:08+5:302020-08-16T01:07:16+5:30
जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात १५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली.
ठाणे : जिल्ह्यात चार दिवसांपासून संततधार सुरु असून शनिवारीही अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरींचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. ध्वजारोहण सोहळ््याच्या वेळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ठाणे शहर परिसरात ७६ मि.मी. पाऊस झाला. या तुलनेत जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात १५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली.
जिल्ह्यातील शहरांना, एमआयडीसीला, गांवपाड्यांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात व परिसरात २४ तासात सरासरी ११९ मि.मी. पाऊस पडला. यापैकी बारवी धरणात १५६ मि.मी., खानिवरे १६८ मि.मी., कान्होळ ११७ मि.मी., पाटगांव ८१ मि.मी. आणि ठाकूरवाडी ११० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली. बारवी धरणाची पाणी पातळी ६८.२८ मीटर झाली असून या धरणात अजून ४.३२ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. त्यानंतर या धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील. धरणातील आजचा पाणीसाठा ६६.६६ टक्के असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ९९.६५ टक्के होता
बारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. धरण भरण्याच्या आधीच पिंपळोली, चांदप, दहागांव, चोन, अस्नोली राहटोली, सागांव पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चांदपपाडा आदी बारवी नदी काठावरील गांवाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.