११२ वर्षांत प्रथमच पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन; श्री आनंद भारती समाजाने ठेवला आदर्श
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 10, 2022 04:22 PM2022-09-10T16:22:54+5:302022-09-10T16:23:28+5:30
चेंदणी बंदरावरअशा पद्धतीने विसर्जित होणारी आमची एकमेव मूर्ती होती असा दावा संस्थेने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाच्या ११२ वर्षीच्या श्री गणेश उत्सवास प्रथमच हेली कॉप्टरने पुष्प वृष्टी करून गणेश चतुर्थीला प्रारंभ झाला. तसाच इतिहास अनंत चतुर्दशी म्हणजेच शुक्रवारी नोंदला गेला. ११२ वर्षांत प्रथमच श्री आनंद भारती समाजाचे पर्यावणपूरक श्री गणेश विसर्जन केले. यावर्षी विसर्जन घाटावर श्री गणेशाचे विसर्जन न करताना श्री आनंद भारती समाजाने पर्यावरणाचे भान राखत एका मोठ्या पिंपात विसर्जन केले आणि इथून पुढे अशा पद्धतीनेच गणरायाचे विसर्जन केले जाईल अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
श्री आनंद भारती समाज, ठाणे या संस्थेने स्थापना वर्षी १९१० साली संस्थापक दिवंगत दगडू पांडू नाखवा यांचा संकल्पनेतून माणिक भूवनात ठाणे नगरीचा आद्य सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला. ११२ वर्षांत प्रथमच चेंदणी कोळीवाड्यातील चेंदणी बंदरावरीलगणेश विसर्जन घाटवावर एका मोठ्या पिंपात पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन कार्यकारिणी सदस्य सुनीलकोळी यांनी केले, अशी माहिती कार्यवाहक विवेक मोरेकर यांनी दिली.या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना कार्याध्यक्ष महेश कोळी म्हणाले कि पर्यावरण पूरक गणेश विसर्जनव्हावे, ही वसुंधरेची हाक सर्वांना साद घालतेय. यंदापासून आपण संस्थेच्या गणेशाचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करू या ,या माझ्या प्रस्तावास कार्यकारिणीसह समाज बांधवानी एकमुखी पाठिंबा दर्शविला.
गणेशतत्वाने भारीत झालेले विसर्जन जल शनिवारी संस्थेच्या आवारातील झाडांना दिले गेले. चेंदणी बंदरावरअशा पद्धतीने विसर्जित होणारी आमची एकमेव मूर्ती होती असा दावा संस्थेने केला. कोपरी पोलीस स्टेशन शांतता समिती सदसय भरत मोरे यांनी माहिती दिली की, चेंदणी बंदरावर काल३१ सार्वजनिक तर १६२ खाजगी गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. पण पर्यावण पूरक गणेश विसर्जन फक्त श्रीआनंद भारती समाजाने केले व त्याची नोंद घेण्यात आली आहे.