श्रीकांत देशपांडे यांना धन्वंतरी पुरस्कार, २५ डॉक्टरांना केले सन्मानित
By सदानंद नाईक | Published: October 25, 2022 05:10 PM2022-10-25T17:10:44+5:302022-10-25T17:12:17+5:30
उल्हासनगरातील मराठा सेक्शन येथील आशिर्वाद हॉस्पिटल अंतर्गत वैद्यकीय सेवा देणाऱ्यां डॉ श्रीकांत देशपांडे यांनी धनवंतरी पुरस्काराने मयूर हॉटेलमधील सभागृहात सन्मानित केले गेले.
उल्हासनगर : वैद्यकीय क्षेत्रात गेली ३८ वर्ष सेवा देणारे डॉ श्रीकांत देशपांडे यांना मानाचा धन्वंतरी मेडिकल अवॉर्ड पद्मभूषण डॉ सुरेश आडवाणी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या २५ डॉक्टरांना यावेळी सन्मानित केल्याची माहिती निमाचे अध्यक्ष डॉ नरेंद्र पंजवानी यांनी दिली.
उल्हासनगरातील मराठा सेक्शन येथील आशिर्वाद हॉस्पिटल अंतर्गत वैद्यकीय सेवा देणाऱ्यां डॉ श्रीकांत देशपांडे यांनी धनवंतरी पुरस्काराने मयूर हॉटेलमधील सभागृहात सन्मानित केले गेले. गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो. उर्फ निमा या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत संस्थेच्या वतीने यंदाचा मानाचा धन्वंतरी मेडिकल पुरस्कार डॉ देशपांडे यांना पद्मभूषण डॉ सुरेश आडवाणी यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी आमदार कुमार आयलानी, माजी महापौर हरदास माखिजा, उमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश नाथानी यांच्यासह निमाचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉक्टर संजय पवार यांनी पुरस्कार प्राप्त डॉ श्रीकांत देशपांडे याच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती करून दिली. यावेळी कोरोना काळातील बिकट परिस्थितीत आपली वैद्यकीय सेवा देणा-या २५ डॉक्टरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॅा सुरेश आडवाणी यांनी यावेळी डॉक्टरांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉक्टरांनी निव्वळ मेडिकल रिपोर्टवर व चाचण्यांवर निदान न करता रूग्णाशी डोळ्यात डोळे घालून संवाद साधावा, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यामुळे रूग्णाचे निदान उत्तम प्रकारे होऊन रूग्णास ८० टक्के दिलासा मिळतो. मात्र आजचे तरूण डॅाक्टर रिपोर्ट पाहून निदान करतात व रूग्णाशी न बोलता कंपाऊंड मार्फत संदेश देतात, ही प्रथा चुकीची आहे. डॉक्टरांनी रूग्ण व त्याचे निकटचे नातेवाईक यांच्याशी आस्थेने व मोकळेपणाने बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. कारण रूग्ण अतिशय विश्वासाने डॉक्टरकडे येत असतो. वैधकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती व संशोधन होत असल्याने सतत अभ्यास करीत राहिले पाहिजे व अद्ययावत ज्ञान आत्मसात केले पाहिजे. या कार्यक्रमाचे सुनियोजित आयोजन निमाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पंजवाणी, सचिव मनिष रिजवाणी, खजिनदार डॅाक्टर राजकुमार इसराणी व त्यांच्या सहकार्यांनी केले होते.