वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:53 PM2018-08-15T15:53:37+5:302018-08-15T15:54:05+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
ठाणे : सलग दोन वर्षे लोकसहभागातून, हजारो हातांच्या सहकार्याने १ लाख ६० हजार वृक्षांचे रोपण आणि १० गावांमधील गावतलाव आणि बंधाऱ्यांमध्ये २५ वर्षांपासून साचलेला गाळ काढून पाणीटंचाईवर मात करण्याबरोबरच शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामात भाजीपाल्याची लागवड करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आज, १५ ऑगस्ट निमित्त राज्य सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
खा. डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एक लाख वृक्षलागवडीचे महाअभियान राबवले होते. या अभियानात २० हजारहून अधिक लोक आणि विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. केवळ एक दिवसापुरते अभियान न राबवता या झाडांच्या संगोपनासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. टेकडीच्या वरच्या बाजूस पाण्याची टाकी बांधण्यात आली असून झाडांच्या देखभालीसाठी माणसेही नियुक्त केली आहेत. काही महिन्यांपूर्वी समाजकंटकांनी या झाडांना आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुमारे २५ हजार झाडांचे नुकसान झाले होते. ही झाडे पुन्हा लावण्यात आली असून वणवा लागण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी नियमितपणे गवत कापण्याची खबरदारी घेतली जात आहे.
यंदाच्या वर्षी देखिल अंबरनाथ शहरानजीक, जावसई गावी वनविभागाच्या जागेवर लोकसहभागातून ६० हजार झाडे लावण्याचे अभियान राबवण्यात आले. श्रीमलंग गड परिसरातील गावांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ २५ वर्षांत काढण्यात आला नव्हता. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे पाऊस भरपूर पडूनही जमिनीत पाणी मुरत नाही. तीव्र डोंगर उतारामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून येऊन तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचून पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून १० गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील सुमारे ४० हजार ब्रास गाळ काढला. त्यामुळे या गावांना किमान १० कोटी लीटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. एरवी ऑक्टोबरनंतर कोरडे पडणाऱ्या तलावांमध्ये मे अखेरीपर्यंत पाणी राहू लागले. शेतकऱ्यांनाही केवळ भातशेतीवर अवलंबून न राहाता रब्बी हंगामात भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न वाढवणे शक्य झाले.
गेली सलग दोन वर्षे खा. डॉ. शिंदे राबवत असलेल्या या उपक्रमांबद्दल राज्य सरकारच्या वतीने त्यांचा १५ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. ‘हा सत्कार माझा एकट्याचा नाही. हजारो लोक या सहभागी झाल्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकले. हजारो लोक, संस्था, प्रशासकीय अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारत आहे,’ अशी विनम्र भावना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.