VIDEO: श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात; शिंदे समर्थकांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:58 PM2022-06-25T16:58:18+5:302022-06-25T16:59:55+5:30
कॅम्प नं-३ गोल मैदानातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची दुपारी संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक करून तोडफोड केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर :
कॅम्प नं-३ गोल मैदानातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची दुपारी संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकारने एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील शिवसैनिकांची खदखद बाहेर पडली असून शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांना यावेळी शिवसैनिकांनी इशारा दिला.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली असून शिवसेनेची ताकद मोठी आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला जिल्ह्यातून पाठिंबा मिळत असलातरी, शहरातील शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवकात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान शिवसैनिकात शिंदे यांच्या विरोधात प्रचंड खदखद निर्माण झाल्याचे चित्र होते. शनिवारी दुपारी कॅम्प नं-१ येथील शाखा प्रमुख सुरेश पाटील, नितीन बोथ, उमेश पवार यांच्यासह शिवसैनिकांनी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय गाठून त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सुरेश पाटील यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच, शिंदे यांच्या समर्थनार्थ उपशहरप्रमुख प्रमुख व माजी नगरसेवक अरुण अशान, विजय पाटील यांच्यासह काही जणांनी शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांना केली.
VIDEO: उल्हासनगरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड pic.twitter.com/aPk51FURPA
— Lokmat (@lokmat) June 25, 2022
दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सुरेश पाटील यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, सुरेश सोनावणे, भुल्लर महाराज, युवा अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या धाव घेतली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकारने शिवसेनेत उभी फूट पडलीतरी, बहुतांश शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र शहरात आहे.
शिंदे समर्थकांची कोंडी?
माजी महापौर लिलाबाई अशान, माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख अरुण अशान, विजय पाटील यांच्यासह मोजकेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचे उघडउघड समर्थन करीत आहेत. मात्र आक्रमक शिवसैनिकांच्या पावित्र्याने त्यांची कोंडी झाल्याचें उघड होत आहे.