योगायोग की...; शिंदे-जोशी-आहेर एकाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल
By रणजीत इंगळे | Published: February 16, 2023 07:38 PM2023-02-16T19:38:29+5:302023-02-16T19:39:16+5:30
आहेर उपचार घेत असलेल्या रूग्णालयात खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय सचिन जोशी यांनाही ऍडमिट करण्यात आले आहे.
ठाणे - राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर ठाण्यात राजकिय वातावरण तापले आहे. बुधवारी संध्याकाळी ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर आव्हाड समर्थकांनी हल्ला झाला. त्यांनतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आहेर उपचार घेत असलेल्या रूग्णालयात खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय सचिन जोशी यांनाही ऍडमिट करण्यात आले आहे. या दोघांची तब्बेत बिघडली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री आहेर यांना भेटायला नाही तर आपल्या निकटर्तीयांना भेटायला गेले असल्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान हा योगायोग असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी हल्ला केला असताना बाहेर वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे एकाच रूग्णालयात एकाच मजल्यावर आहेर, जोशी आणि खासदार श्रीकांत शिंदे उपचार घेत असल्यानं बाहेर चर्चेची चांगलीच खिचडी पिकत आहे. मुख्यमंत्री आजही त्या खासगी रुग्णालायाला भेट देणार असल्याची माहिती आहे.