अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:34+5:302021-03-13T05:13:34+5:30
अंबरनाथ : कोरोनामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा भाविकांना प्रवेश दिला नसल्याने परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात ...
अंबरनाथ : कोरोनामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा भाविकांना प्रवेश दिला नसल्याने परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात किमान चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. मात्र यंदा मंदिरासोबत मंदिराकडे जाणारे रस्तेही बंद केल्याने भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आले नाही.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रात्री १२ वाजता मंदिराचे पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. यानंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. हे शिवमंदिर तब्बल ९६१ वर्षे जुने असून इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडले. त्यामुळे यंदा चुकचुकल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया मंदिराचे पुजारी रवी पाटील यांनी दिली. भाविकांच्या सुरक्षेच्या हेतूने प्रवेश नाकारण्यात आल्याची प्रतिक्रिया अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी दिली.
मंदिर परिसरात भाविकांचा प्रवेश होऊ नये यासाठी मंदिराची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. सोबत या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही नाकाबंदी करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जत्रेसाठी येणाऱ्या विक्रेत्यांनाही मंदिर परिसरात मज्जाव केला होता. भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी अंबरनाथच्या स्थानिक केबलच्या वतीने मंदिरातील गाभाऱ्यातून थेट प्रक्षेपण समाज माध्यमांवर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घेतला.