डोंबिवलीत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:58+5:302021-04-11T04:38:58+5:30
डोंबिवली : कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शनिवारी शहरात व ठाकुर्ली परिसरात पहाटेपासून शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचीही वर्दळ ...
डोंबिवली : कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शनिवारी शहरात व ठाकुर्ली परिसरात पहाटेपासून शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचीही वर्दळ कमी होती. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू होती. रिक्षासाठीही फारसे प्रवासी नसल्याने एरवी गजबजलेला स्टेशन परिसर रिकामा होता.
भाजी बाजार, फेरीवाले, हातगाडीवरील आणि अन्य किरकोळ विक्रेते यांसह मोठे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. दुचाकी, चार चाकी वाहने अपवाद वगळता रस्त्यावर नव्हती. त्यामुळे गतवर्षी ज्या पद्धतीने एप्रिलमध्ये लॉकडाऊन होता त्याची चुणूक पुन्हा शनिवारी दिसून आली. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अशा पद्धतीने लॉकडाऊन झाल्यास काही प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास वैद्यक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. मात्र सोमवारी गर्दी होऊ नये आणि मंगळवारी गुढीपाडवा असल्यानेही गर्दीचा उच्चांक होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेणे, नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. लोकल प्रवासालाही नेहमीसारखी वर्दळ दिसली नाही. त्यामुळे स्थानक परिसर मोकळा होता. लोकलही तुलनेने रिकाम्या धावल्या. तिकीटघरातही शुकशुकाट होता.