प्रताप सरनाईक यांच्या घराबाहेर शुकशुकाट, फोन होते 'नॉट रिचेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 05:24 AM2020-11-26T05:24:02+5:302020-11-26T05:24:50+5:30
फोन होते 'नॉट रिचेबल'; ईडीच्या पुढील कारवाईकडे लक्ष
ठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर, त्यांचे पुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तर, बुधवारी सकाळी सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलाला ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे ठाण्यातील त्यांच्या घराबाहेर बुधवारी सकाळपासून मीडियाचा घोळका झाला होता. परंतु, दुपारपर्यंत हाती काहीच लागले नाही. सरनाईक हे घरी नसल्याने ठाण्यातील त्यांच्या घराबाहेर दिवसभर शुकशुकाटच होता.
मंगळवारी ईडीच्या पथकाने विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची तब्बल सहा तासांच्या आसपास चौकशी केली होती. त्यानंतर, सरनाईक यांनाही हजर राहण्याचे सांगितले जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांना व त्यांचा मुलगा विहंग यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, बुधवारी सकाळपासूनच मीडियाच्या प्रतिनिधींनी ठाण्यातील वसंत लॉन, छाब्रिया हाऊस आणि हिरानंदानी इस्टेट येथील घरांसमोर घोळका केला होता. सरनाईक ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी इमारतीखाली येतील, अशी आशा सर्वांनाच वाटत होती. किमान, मुलगा तरी खाली येईल म्हणून सर्व जण वाट बघत होते. सरनाईक आपली बाजू मांडतील, अशीही शक्यता वर्तविली जात होती. परंतु, एकाही घरातून कोणीच खाली आले नाही. कार्यकर्तेही दिसून आले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे फोनही बंद होते.
काय आहे प्रकरण ?
टॉप समूहाच्या दोन अधिकाऱ्यांनी कंपनी आणि कंपनीचे संस्थापक राहुल नंदा यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी चलनविषयक आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी दंडाधिकाऱ्यांकडे केली. ऑक्टोबरमध्ये यलाेगेट पोलीस ठाण्यात राहुल नंदा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करत, ताे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
यात १७५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीने मॉरिशस येथे स्थापन केलेल्या संस्थेच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी ब्रिटनमधील एका कंपनीने सुमारे दीडशे कोटींची गुंतवणूक केली, या दोन्ही व्यवहारांमध्ये आरबीआयच्या विदेशी चलनविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात आले, असा आरोपही दोन अधिकाऱ्यांनी केला होता.
याच आधारे गुन्हा नोंद करून ईडीने तपास सुरू केला. कंपनीचे संस्थापक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक हे मित्र आहेत. त्यांच्या व्यवसायात सरनाईक यांची गुंतवणूक आहे का? हे पडताळण्यासाठी चौकशी केल्याचे समजते. मात्र नंदा यांनी याबाबतचे सर्व आरोप फेटाळले. तसेच प्रताप आणि आपल्यात फक्त मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले.
कारवाई राजकीय हेतूने प्रेरित
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात राजकीय हेतूने प्रेरित कारवाई सुरू असून हे दुर्दैवी आहे. शासकीय तपास यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर होणे योग्य नाही. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष सरनाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या तपासातून ते सहीसलामत बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे.
- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री, पालकमंत्री, ठाणे जिल्हा