वाढीव वीज बिले आल्याने कोपरीतील नागरिकांचा "शटडाऊन"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:34 PM2020-09-04T20:34:29+5:302020-09-04T20:35:01+5:30
15 मिनिटे विदुयत उपकरणे बंद ठेवून सरकारचा निषेध
ठाणे : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकट आले असताना देखील नागरिकांना वाढीव वीज बिले देण्यात आली आहेत. राज्य सरकार अद्याप काहीही बोलण्यास तयार नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी ठाणे पूर्व येथील नागरिकांनी तब्बल 15 मिनिटे घरातील विदुयत उपकरणे बंद ठेवून महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. एककिडे लॉकडाऊन असताना आम्ही वीज बंद करून शटडाऊन करून या सरकारचा निषेध केला असल्याचे आंदोलनाचे आयोजक स्थानिक भापज नगरसेवक भरत चव्हाण यांनी यावेळी सांगितले. वाढीव वीज बिल संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तीन-चार महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना बिलांची रक्कम कमी करून दिली जाईल वा त्यांना परतावा दिला जाईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीने देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसून नागरिकांना वाढीव वीज बिले देण्यात येत आहेत. महावितरण कंपनी कडून लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही काहीही मार्ग निघत नसल्याने आमच्या हातात काही नसल्याचे थातुरमातुर उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची वीज बिले जून आणि जुलैमध्ये एकत्रितपणे देण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग, बिलांचे वाटप होऊ शकले नाही. १ एप्रिलपासून नवे वीज दर लागू झाले. विजेचा वापर कमी करूनही बिले मात्र अव्वाच्या सव्वा आकारल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे कोपरी येथील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी 15 मिनिटे वीज बंद ठेवून एकप्रकारे राज्य सरकारचा निषेध केला.