आठवडाभरात कारवाई न झाल्यास शटर डाउन आंदोलन
By admin | Published: January 10, 2017 06:19 AM2017-01-10T06:19:29+5:302017-01-10T06:19:29+5:30
रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याने सोमवारी स्टेशन परिसरातील
ठाणे : रस्ता रुंदीकरणानंतरही स्टेशन परिसरात बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याने सोमवारी स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून पालिकेच्या कुचकामी कारवाईचा निषेध केला. या वेळी पालिका आयुक्तांनी स्वत: येथील पाहणी करण्याचे आणि कारवाईचे आश्वासन दिले.
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची या वेळी भेट घेतली असता कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या आठवडाभरात स्टेशन परिसरातील फेरीवाले हटले नाहीत तर राममारुती रोड, नौपाडा, स्टेशन आणि जांभळीनाका भागांतील तब्बल १२०० व्यापारी पुढील आठवड्यात शटर डाउन आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
महापालिकेने स्टेशन परिसरातील अरुंद रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली. यासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकानेदेखील तोडण्यास परवानगी दिली. परंतु, त्यानंतर आता या रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेने या भागात टीमदेखील तैनात केली आहे. परंतु, असे असताना त्यांचे बस्तान वाढल्याचा आरोप सोमवारी व्यापाऱ्यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही केवळ कारवाईचा फार्स केला जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे स्टेशन परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला असतानादेखील या भागात त्यांचे प्रस्थ वाढत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी कारवाई करण्यासाठी येते. परंतु, या कारवाईची भणक व्हॉट्सअॅपवर मिळताच फेरीवाले पळ काढतात. त्यामुळेच, ही कारवाई अधिक तीव्र व्हावी, ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून या परिसराकडे पाहिले जावे, वाहनांची येजा करण्यासाठी हा रस्ता मोकळा असावा, अशा विविध मागण्या व्यापाऱ्यांनीच केल्या आहेत. दरम्यान, या वेळी त्यांनी सुरुवातीला आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर, गेटवरच त्यांना अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर, त्यांनी पोलीस आयुक्तांचीदेखील भेट घेतली. या वेळी पोलीस आयुक्तांनी फेरीवाल्यांवरील कारवाईची जबाबदारी ही पालिकेचे असल्याचे सांगितले. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मदतीला असतीलच, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)