कल्याणमध्ये दुकानांचे शटर ‘डाउन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:11+5:302021-03-28T04:38:11+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्त ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, शनिवारी कल्याणमध्ये रेल्वेस्थानक रोड आणि बाजारपेठ परिसरातील सर्व दुकाने बंद होती. विशेष म्हणजे फेरीवाल्यांनीही या आदेशाला चांगला प्रतिसाद देत आपला व्यवसाय बंद ठेवला.
महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना यापूर्वीच ११ मार्चपासून विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्यात आता पुन्हा शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय इतक्या तातडीने घेतल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीत त्याचे पडसाद उमटले. मात्र, दुकानदारांच्या या विरोधावर आयुक्तांनी त्यांचा निर्णय मागे घेतला नाही. कोरोना रोखणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट समोर असल्याने त्यात हयगय केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, कल्याण रेल्वेस्थानक परिसर, बिर्ला रोड परिसर, मोहने आणि आंबिवली परिसरांतही दुकाने बंद होती. मात्र, किराणा, दूध, औषधांची दुकाने, दवाखाने अशा अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. दुसरीकडे मनपाने होळी व धूळवड साजरी करण्यावर निर्बंध लादले आहेत. आयुक्तांच्या आदेशामुळे रविवारी होळीच्या दिवशीही दुकाने बंद राहणार आहेत.
एपीएमसी आज राहणार बंद
- मनपा हद्दीतील भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनुसार चालवण्यात येतील, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार, शनिवारी भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनुसार सुरू होत्या. मात्र, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर कल्याण-शीळ रस्त्यावर काही भाजी व्यापारी, विक्रेते त्यांचा माल विकताना दिसून आले.
- मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार रविवारी बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. दररविवारी बाजार समिती बंद ठेवली जाते. रविवारी बाजार समितीत स्वच्छता, जंतुनाशक फवारणी केली जाते. रविवारी बाजार समितीच्या बाहेर शेतमालाचा व्यापार सुरू असतो. मात्र, त्याला काही इलाज नाही, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
----------------