ठाण्यातून कर्जत, कसाऱ्यासाठी शटल सेवा होऊ शकते सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 08:41 AM2024-07-01T08:41:12+5:302024-07-01T08:41:43+5:30
विनायक थत्ते यांचे मत : मेल, एक्स्प्रेस गाड्यांकरिता चार मार्गिका का केल्या राखीव?
अनिकेत घमंडी
डोंबिवली : ठाणे स्थानकातून कर्जत, कसाऱ्याकडे गाड्या परत फिरवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. तीन उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ४ वरूनही शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ६, ७ व ८ वरूनही कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने गाड्या सोडल्या जाऊ शकतात. या तिन्ही प्लॅटफॉर्मवर होम सिग्नल आहे. गाडी कल्याणच्या दिशेने पाठविण्यासाठी क्रॉसओव्हरदेखील असल्याचे मत रेल्वे समस्यांचे अभ्यासक विनायक थत्ते यांनी व्यक्त केले.
‘ठाण्यातून कर्जत, कसारा मार्गावर शटल सेवा चालवा’ या ‘लोकमत’मधील वृत्ताची अनेक रेल्वे अभ्यासकांनी नोंद घेतली. ठाण्यातून ही वाहतूक कशी वाढवता येईल, याची माहिती त्यांनी दिली. थत्ते म्हणाले की, कल्याणवरून येणाऱ्या धिम्या लोकलसाठी अप धिम्या ट्रॅकवर ठाणे स्टेशनच्या दिशेने सिडको बस स्टॉपच्या सबवेवरून प्लॅटफॉर्म क्र. २ वर एक क्रॉसओव्हर टाकल्यास, ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील होम सिग्नलच्या नॉर्मल सिग्नलमध्ये बदल केल्यास, आपत्कालीन स्थितीत कल्याणच्या दिशेने ठाण्याहून लोकल परत कसाऱ्याकडे पाठविण्यास प्लॅटफॉर्म क्रमांक तीनप्रमाणेच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व चार वापरता येऊ शकतील.
प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून आपत्कालीन स्थितीत मेल एक्स्प्रेस गाड्या किंवा लोकल, स्लो ट्रॅकवर आणण्यासाठी खाडी पुलावर क्रॉसिंग आहे. अतिरिक्त मार्गिकेमुळे ज्यावेळी मुंबई येथून मेल एक्स्प्रेस गाड्या सुटतात किंवा मुंबईकडे येतात त्याच स्लॉटमध्ये मध्य रेल्वेला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बनवणे शक्य झाले. त्यामुळे सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या पारसिक टनेल येथून जातील या त्यांच्याच आश्वासनाला त्यांनी हरताळ फासला.
उपनगरीय लोकल प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ
मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी १२ तास, २४ तास, ३६ तास व सगळ्यात शेवटी ७२ तासांचा ब्लॉक घेऊन ठाणे ते दिवामधील पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण केले. त्यावेळी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या या पारसिक बोगद्यातून रवाना होतील व त्यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यान लोकल सेवेसाठी चार मार्गिका उपलब्ध असतील, असा दावा केला होता. चार मार्गिकांचा उपयोग लोकल प्रवाशांना करून देण्याऐवजी चार मार्गिका मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव झाल्या व फक्त दोन मार्गिका लोकल गाड्यांसाठी उपलब्ध झाल्या. त्यामुळे उपनगरी लोकल प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ झाली.
वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे त्यात अजून भर पडणार आहे. ज्यावेळी पाचवी व सहावी मार्गिका अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी मध्य रेल्वेला अशा प्रकारे वेळापत्रक तयार करता आले नसते. कारण, जलद लोकलसाठी तसेच मुंबई व लोकमान्य टिळक टर्मिनल येथून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी पारसिक टनेल हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. -विनायक थत्ते, रेल्वे समस्यांचे अभ्यासक