टिटवाळा-आंबिवली मार्गावर सिग्नल फेल; मुंबईतील लोकल प्रवाशांना फटका
By अनिकेत घमंडी | Published: December 7, 2022 08:40 AM2022-12-07T08:40:19+5:302022-12-07T08:42:37+5:30
बुधवारी सकाळच्या घोळामुळे देखील प्रवासी नाराज झाले असून हा गोंधळाचा फटका बसल्याने काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी लेटमार्कला सामोरे जावे लागणार असल्याचे दडपण होते
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या टिटवाळा आंबिवली मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली, त्यामुळे काही वेळ त्या मार्गावर जाणाऱ्या दुतर्फा लोकलची वाहतूक खोळंबली होती. कसारा ते टिटवाळा जाणाऱ्या येणाऱ्या लोकल त्यामुळे प्रभावित झाल्या होत्या, त्यामुळे त्या भागातील आसनगाव, वसिंद, अटगाव, खर्डीसह टिटवाळा स्थानकात प्रवासी ताटकळले होते. अनेक महिन्यांपासून त्या मार्गावर लांबपल्याच्या गाड्या लोकल वेळापत्रकादरम्यान धावत असल्याने सामान्य चाकरमान्यांच्या नियोजनावर रेल्वेकडून सपशेल पाणी फिरवले जाते, त्यामुळेच, गेल्या महिन्यात प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केले होते.
बुधवारी सकाळच्या घोळामुळे देखील प्रवासी नाराज झाले असून हा गोंधळाचा फटका बसल्याने काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी लेटमार्कला सामोरे जावे लागणार असल्याचे दडपण होते. त्यामुळेही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल चर्चा केली. या बिघडाबाबत रेल्वे प्रशासनाने उद्घोषणा यंत्राद्वारे माहिती देणे अपेक्षित होते, परंतु ते वेळेत न झाल्यानेही प्रवाशांना नेमका घोळ काय झाला होता याची माहिती मिळाली नाही, त्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली होती. त्या सिग्नल बिघाडाची २५ मिनिटांनी दुरुस्ती झाल्यानंतर रेल्वे वाहतूक हळुहळु सुरू झाली. मात्र, त्यामुळे कल्याण कसारा मार्गावरील लोकल वाहतूक सकाळच्या सत्रात अर्धा तास विलंबाने सुरू असल्याने कल्याण, डोंबिवली स्थानकात तोबा गर्दीला प्रवाशांना सामोरे जावे लागले.