सिग्नल शाळेला बाप्पा पावला, सुमारे ५० हजार देणगी जमा : ठाणे-मुंबईकरांचे सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:43 AM2017-09-22T03:43:51+5:302017-09-22T03:43:55+5:30
ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येकाचा मदतीचा हातभार लागावा, या उद्देशाने या गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सुरू केलेल्या गणपती देणगी बॉक्सला ठाणे-मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला
स्नेहा पावसकर
ठाणे : ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येकाचा मदतीचा हातभार लागावा, या उद्देशाने या गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सुरू केलेल्या गणपती देणगी बॉक्सला ठाणे-मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सिग्नल शाळेला जणू गणपती बाप्पाच पावला आहे. जवळपास १५० बॉक्समधून सुमारे ५० हजार इतकी देणगी जमा झाली असून त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केला जाणार आहे.
सिग्नलवर राहणा-या आणि विविध वस्तू विकणा-या मुलांसाठी वर्षभरापूर्वी तीनहातनाका येथे ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न असून शहर बालभिकारीमुक्त करणे त्यांचा मानस आहे. त्यासाठी लोकसहभागाची आणि अर्थातच आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. समाजातील काही व्यक्ती यासाठी साहाय्य करतात. मात्र, ही संकल्पना प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि त्यांचा खारीचा वाटा या उपक्रमात असावा, या उद्देशाने गणेशोत्सवादरम्यान शक्य त्यांनी आपल्या घरातील, मंडळातील किंवा सोसायटीतील गणपती बाप्पाच्या पुढे हा देणगी बॉक्स ठेवावा आणि त्यातून जमा होणारी रक्कम सिग्नल शाळेला साहाय्य म्हणून द्यावी, असे आवाहन व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
सुमारे १५० देणगी बॉक्स विविध व्यक्ती, संस्थांनी नेले होते. त्यात काहींनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात हे बॉक्स ठेवले. ठाण्यातील माधुरी घारपुरे यांच्या विज्ञानविषयक क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी ३७ बॉक्स नेले होते. तर, मुलुंडमधील एका शाळेनेही २० बॉक्स नेले होते. याशिवाय, काही गृहनिर्माण संस्थांच्या गणेशोत्सवातही हे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यात अनेकांनी देणगी टाकून सामाजिक भान
जपले.
गणेशोत्सवानंतर हे बॉक्स व्यासपीठाकडे जमा झाले असून त्यातून सुमारे ५० हजार देणगी जमा झाली आहे. दिलेल्या देणगीची देणगीदारांना पावती देण्यात येणार आहे.
>गणपती देणगी बॉक्स या अनोख्या उपक्रमालाही ठाणे-मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या शाळेतील मुलांचा पोशाख, आहार, शैक्षणिक वस्तू, शिक्षकांचे पगार या सगळ्यांचा महिनाभराचा खर्च सुमारे सव्वा लाख रुपये होतो. त्यामुळे देणगी बॉक्समधून जमा झालेल्या रकमेतून शाळेचा अर्ध्या महिन्याचा खर्च नक्कीच भागेल.
- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, समर्थ भारत व्यासपीठ