सिग्नल शाळेचे विद्यार्थी बनले आरटीओचे सदिच्छादूत, पोलिसी गणवेशात करणार जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:58 AM2020-01-19T01:58:54+5:302020-01-19T01:59:42+5:30
महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत.
ठाणे : तीनहातनाका सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून जीवन जगणारी मुले सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. आता ही मुले याच सिग्नलवर आरटीओचे सदिच्छादूत म्हणून वाहनधारकांमध्ये रस्तासुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करणार आहेत. या मुलांना आरटीओ त्यासाठी पोलिसांसारखा विशेष गणवेशही देणार आहे. रविवारी सकाळी ७ वाजता एका कार्यक्र मात त्यांना गणवेश देऊन रस्तासुरक्षा अभियानाचे सदिच्छादूत म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत. ठिकठिकाणी बॅनर्स, प्लेकार्ड लावले जातात. अनेकवेळा रस्ता सुरक्षा अभियान केवळ औपचारिकता म्हणून होते. ही कमतरता दूर करण्यासाठी ठाणे आरटीओ आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांनी मिळून एक कल्पक योजना आखली. त्यानुसार, हे दोघे मिळून वाहनचालक, पादचाऱ्यांना रस्तासुरक्षा नियम पाळण्याबाबत शुभेच्छापत्रवाटप करणार आहेत. या शुभेच्छापत्रात वाहतूक प्रसंगानुरूप चित्रे जी विनोदी, भावनिक असतील, तसेच दुस-या बाजूस रस्तासुरक्षा नियम दिले आहेत.
हा उपक्र म ठाणे-मुंबईला जोडणा-या तीनहातनाका सिग्नल येथे दरमंगळवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. याचा शुभारंभ रविवारी सकाळी ७ वाजता वॉकेथॉनच्या माध्यमातून ठाणे, लुईसवाडी आरटीओ येथून होईल. आरटीओ अधिकारी अपर्णा पाटने याबाबत म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांची निवड करण्यामागचे कारण हे आहे की, विद्यार्थी सिग्नलजवळ राहतात. त्यांची शाळासुद्धा सिग्नलजवळ आहे. रस्तासुरक्षेचे उल्लंघन होताना ते नेहमी बघतात. सततच्या हॉर्नच्या आवाजामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत असतो. जेव्हा हे विद्यार्थी हॉर्न वाजवू नका, आमच्या अभ्यासात व्यत्यय आणू नका, असे लोकांना वारंवार सांगतील, तेव्हा आम्हाला खात्री आहे, की शुभेच्छा घेणारे नागरिक एक न् एक दिवस सिग्नल स्कूलच्या जागेवर आल्यावर आपसूकच हॉर्न वाजवणे थांबवतील. रस्तासुरक्षेचे नियम हे वर्तणुकीमध्ये उतरावयाचे आहेत. उपक्रमाच्या सातत्यामुळे हा परिणाम साधता येईल, असा विश्वास त्यांना आहे.
मुलांना पोलिसी गणवेशाचे अप्रूप! : रस्तासुरक्षा अभियानासाठी ठाणे, तीनहातनाका येथील सिग्नल स्कूल विद्यार्थ्यांची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. सिग्नल शाळेच्या मुलांना पोलिसी गणवेशाचे नेहमीच अप्रूप राहिले आहे. अनेक मुलांना पोलीस होण्याचे स्वप्न आहे. या उपक्र मामुळे त्यांच्यात आत्मविश्वास जागृत होईल. त्याबरोबर रस्तासुरक्षेच्या अभियानातही त्यांना हातभार लावता येईल, अशी अपेक्षा सिग्नल शाळेच्या प्रकल्पप्रमुख आरती परब यांनी व्यक्त केली.