मीरा रोडच्या मुख्य चौकातील सिग्नल महिनाभर बंद
By admin | Published: January 3, 2017 05:33 AM2017-01-03T05:33:51+5:302017-01-03T05:34:46+5:30
मीरा भाईदर मधील सिग्नल वारंवार बंद पडतात. तसेच ते त्वरेने सुरु करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने वाहतुक पोलिसांनी सबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द
मीरा रोड : मीरा भाईदर मधील सिग्नल वारंवार बंद पडतात. तसेच ते त्वरेने सुरु करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने वाहतुक पोलिसांनी सबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी थेट पालिका आयुक्तांकडे केली आहे.
वाहतूक कोंडी टळावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन तसेच वाहतुकीचे नियोजन व्हावे म्हणुन सुमारे १९ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली आहे. शहराचा मुख्य मार्ग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर काशिमीरा नाका ते सावरकर चौका पर्यंत १० सिग्नल आहेत.
सिग्नल यंत्रणेच्या देखभाल - दुरुस्तीचे काम हे पालिकेने युटीलीटी इंटरनिटी या ठेकेदार कंपनीस दिले आहे. तसेच यासाठी १० लाखांची तरतूदही केली आहे. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास वा त्याच्या वेळेत बदल करायचा असल्यास वाहतुक पोलिस थेट ठेकेदारास कळवतात. सिग्नल यंत्रणा वाहतुकीच्या दृष्टीने गरजेची असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असते. परंतु ठेकेदारास वारंवार कळवूनही सिग्नल दुरुस्ती करण्यास विलंब होतो.
सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडते व वाहतूक कोंडी होते. शिवाय तैनात वाहतूक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डनला वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळात तर वाहतुकीचे नियोजन अवघड होते. यात चालकांकडून मोटार वाहन कायद्याचा सर्रास भंग होतोच शिवाय सिग्नल मोडणाऱ्यांविरुध्द कारवाई करणे शक्य होत नसल्याने शासनाचा महसूलही बुडतो. या बाबत वाहतूक पोलिसांनी ४ नोव्हेंबरला पत्रान्वये पालिकेकडे ठेकेदाराची तक्रार केली.
सध्या सावरकर चौक व दिपक रुग्णालया चौका समोरील सिग्नल बंद आहेत. वाहतुक पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी पुन्हा आयुक्तां कडे लेखी तक्रार करुन नाराजी व्यक्त केली आहे. प्रमुख चौकातील सिग्नल बंद असल्याचे कळवूनही त्वरेने दुरुस्ती होत नसल्याने वाहतुकीचे नियोजन व नियम पाळणे अवघड जात आहे. तरी नवीन सिग्नल यंत्रणा बसविणे, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागवून अटीशर्तींची पूर्तता करणाऱ्या ठेकेदारास काम द्यावे, असे चौगुले यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांनी तसे पत्र आल्याचे माहीत नसून तपासून सांगतो, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)