टोकियो ऑलिम्पिकमधील राज्यातील दहा खेळाडूंच्या शुभेच्छांसाठी जिल्ह्यात 'स्वाक्षरी मोहीम अभियान'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:38 PM2021-07-15T18:38:42+5:302021-07-15T18:39:56+5:30
Tokyo Olympics update: '23 जुलै रोजी सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक' स्पर्धेतील विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहे.
ठाणे - '23 जुलै रोजी सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक' स्पर्धेतील विविध खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहे. यासाठी 'स्वाक्षरी मोहीम अभियान कार्यक्रम' येथील जिल्हा क्रीडा परिषद व येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे घेण्यात आले. यावेळी ठाणे महापौर नरेश म्हस्के व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी प्रथम स्वाक्षरी करून, या मोहिमेस गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. ('Signature Campaign' in the district to wish ten athletes from the state for the Tokyo Olympics)
येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत हा स्वाक्षरी मोहीम अभियान कार्यक्रम नियोजन भवन, ठाणे येथे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ठाणे महापौर नरेश म्हस्के यांच्याहस्ते फीत कापून या मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभापती संजय भोईर, ठाणे मनपा सभागृह नेते अशोक वैती, प्रियंका पाटील, मिनल पालांडे, क्रीडा- उपायुक्त आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी या सर्व 10 खेळाडूंना ठाणे जिल्ह्यातर्फे वैयक्तिकरीत्या लेखी पत्र पाठवून शुभेच्छा देण्याबाबत सुचविले. तर प्रमुख पाहुणे महापौर नरेश म्हस्के, यांनी महाराष्ट्रातील या 10 खेळाडूंना संपूर्ण ठाणे वासियांतर्फे पदक प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अनुसरून ठाणे मनपाच्या सहकार्याने दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे ठाणे जिल्ह्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी कोविड-19 लसीकरण मोहिम देखील राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील जवळपास 50 खेळाडूंनी याचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, भक्ती आंब्रे, सुचिता ढमाले, मधुरा सिंहासने, महेंद्र बाभूळकर यांनी परिश्रम घेतले.