आयुक्तांच्या अधिकारात ‘त्या’ फायलींवर स्वाक्षरी, पालिकेचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:29 AM2020-03-06T01:29:45+5:302020-03-06T01:29:53+5:30
पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांच्या वतीने महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे : संजीव जयस्वाल महापालिका आयुक्तांच्या अधिकारात सर्व फायलींवर स्वाक्षरी केली असून त्यामध्ये कोणतीही चूक नसून नगरसेवक नारायण पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांच्या वतीने महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नगरसेवक पवार यांनी महापालिका आयुक्तांनी शहर विकास विभागाच्या २०० फायली निवासस्थानी मागवून त्यावर स्वाक्षरी केली, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ४ मार्चपर्यंत संजीव जयस्वाल हे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत होते. त्यानंतर वैद्यकीय रजा मंजूर झाल्यानंतर त्यांनी ४ मार्च रोजी माध्यानोत्तर अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवला. त्यामुळे जयस्वाल यांनी ज्या फायलींवर स्वाक्षरी केली आहे, ती महापालिका आयुक्त म्हणूनच केली आहे. त्यामुळे पवार यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.
त्याचबरोबर शहर विकास विभागाच्या सुमारे २०० फायलींवर स्वाक्षरी केली, हे वस्तुस्थितीशी विसंगत नाही. ज्या ८ ते १० फायली प्रलंबित होत्या, त्या त्यांच्याबरोबरच विधानसभा तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्नांची उत्तरेही अंतिम केली आहेत.
त्याचबरोबर महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आराखडाही अंतिम केला आहे. शिवाय, आस्थापना आणि महापालिका आयुक्त कार्यालयाकडे इतर विभागांच्या ज्या फायली प्राप्त झाल्या होत्या, त्याच फायलींचा निपटारा केला आहे.
>‘अद्याप बदली नाही’
माझी अद्यापही बदली झालेली नाही. मी वैद्यकीय रजेवर जात असल्याने आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविला आहे. कार्यभार हस्तांतरणानंतर एकाही फायलीवर स्वाक्षरी केलेली नसल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.