ठाण्यातील त्या ७६ रुग्णालयांवर कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:37 AM2021-03-28T04:37:52+5:302021-03-28T04:37:52+5:30
ठाणे : जानेवारीत भंडारा येथे झालेली आगीची दुर्घटना आणि त्यानंतर आता भांडूपमध्ये रुग्णालयास लागलेल्या आगीनंतर ठाण्यातील खासगी रुग्णालये ...
ठाणे : जानेवारीत भंडारा येथे झालेली आगीची दुर्घटना आणि त्यानंतर आता भांडूपमध्ये रुग्णालयास लागलेल्या आगीनंतर ठाण्यातील खासगी रुग्णालये पुन्हा एकदा रडावर आली आहेत. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ३१७ रुग्णांलयांना अग्निसुरक्षा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले होते. त्यानुसार आतापर्यंत २४१ रुग्णालयांनी ते सादर केले आहे. परंतु, उर्वरित ७६ रुग्णालयांनी अद्यापही ते सादर केले नसल्याने महापालिकेने आता या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत अशी अनेक रुग्णालये आहेत जी दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतीत चालतात. जिथे अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून कारभार चालवला जात होता. भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर १४ जानेवारीपासून अग्निशमन दलाने केलेल्या तपासणी मोहिमेनंतर सर्वच रु ग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानुसार या रुग्णालयांना तपासणीनंतर अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार ३० दिवसांत अग्निसुरक्षायंत्रणा सक्षम करणे बंधनकारक केले होते. तशा प्रकारची दुरुस्ती न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाणार होती. ३१७ खाजगी रुग्णालयांची पाहणी अग्निशमन दलाने केली होती. त्यानंतर या सर्वांना योग्य त्या सुरक्षायंत्रणा उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत २४१ खासगी रुग्णालयांनीच त्यांच्या येथे सक्षम अशी अग्निसुरक्षायंत्नणा उभारली आहे. तर इतर रुग्णालयांमध्ये ती उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, तरीदेखील येत्या काही दिवसांत उर्वरित असलेल्या ७६ रुग्णालयांनी अग्निशमनयंत्रणा सक्षम केली नाही तर मात्र त्यांच्यावर कारवाईचे संकेत महापालिकेने दिले आहेत.
विशेष म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये वाघबीळ येथील एका खासगी रुग्णालयातदेखील आग लागली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. दरम्यान, आता ज्या रुग्णालयांनी अद्यापही अग्निसुरक्षायंत्रणा सक्षम केलेली नाही, त्यांच्यावर आता नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.