फेरीवाल्यांसह अनधिकृत गोष्टींवर कारवाईचे संकेत
By Admin | Published: October 5, 2016 02:33 AM2016-10-05T02:33:29+5:302016-10-05T02:33:29+5:30
रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील
ठाणे : रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेचा लेखाजोखा मांडला. त्याची दखल महाराष्ट्र प्रदेश झोनल रेल्वे कमिटी सदस्य (स्पॉट चेक अथॉरिटी, मध्य रेल्वे) कांचन खरे यांनी घेतली. मध्य रेल्वेच्या स्थानकांसह आजूबाजूच्या आवारात फेरीवाल्यांसह ज्या अनधिकृत गोष्टीमुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. त्यांना वेळीच आळा घालण्यास रेल्वे प्रशासन, आरपीएफ, महापालिका आणि शहर पोलीस यांना एकत्र आणून त्याच्या माध्यमातून रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर भर देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
ठाणे-दिवा-कल्याण या जंक्शन असलेल्या स्थानकात अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे मान्य करून त्यांनी कल्याण हे सर्वाधिक अस्वच्छता असलेले स्थानक असल्याचे शिक्कामोर्तब केले. या स्थानकातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेला वेळीच पायबंद करण्यासाठी रेल्वे प्रशासन-आरपीएफ, शहर पोलीस आणि महापालिका यांना एकत्र आणून स्थानकातील अनधिकृत फेरीवाले, भिकारी, गर्दुले असो या पार्किंग यांना आळा घालण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी कल्याण -डोंबिवली महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने स्थानकातील कचरा मुक्तीसाठी विशेष मोहिम राबवली होती. त्याचप्रमाणे अस्वच्छता आणि दुर्गंधीला आळा घातला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा फेरीवाले हटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर अनाधिकृत पार्र्किंग, भिकारी आणि गर्दुले हटविण्यास प्राधान्य देणार आहे.गर्दुल्यांबाबत सामाजिक संस्था आणि पोलसांमार्फत मोहिम राबविताना, त्यांच्यात जनजागृती करताना, त्यांची नोंदणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणपाठोपाठ डोंबिवली, दिवा आणि ठाणे असे स्थानक घेऊन तेथील प्रशासनामार्फत स्वच्छतेवर भर देताना, दिव्यात खास असे लक्ष दिले जाईल. तसेच ज्या लांबपल्लयाच्या गाड्यांमुळे होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बायोटॉयलेट हा पर्याय आणला असून त्याची मध्य रेल्वे मार्गावरही लवकर अमंलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सोयींमुळे प्रवाशांना याची सवय होईल. पण त्यांनी ते जपणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)