मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:38 AM2021-03-09T02:38:26+5:302021-03-09T02:39:15+5:30

निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची भीती : कुरघोडीची व्यक्त केली शंका

Signs of Mansukh Hiren murder case getting political color | मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची चिन्हे

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची चिन्हे

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्फोटकांची मोटार आणि याच मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्र सरकारची राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे यापूर्वीच हा तपास सोपविला होता. गेल्या वर्षभरापासून केंद्र व राज्य सरकारकडून आपापल्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा परस्परविरोधी वापर सुरू आहे. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाला राजकीय रंग लाभण्याची भीती त्यांचे नातलग व निवृत्त पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची मोटार मिळणे आणि त्याच मोटारीच्या मालकाचा कालांतराने संशयास्पद मृत्यू होणे या दोन्ही घटना एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळेच या घटनांचा तपास कोणत्याही एका संस्थेने त्यातही एटीएससारख्या तपास संस्थेने करणे आवश्यक आहे. अन्यथा, या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडे तपास गेल्यामुळे दोन्ही यंत्रणांमध्ये पर्यायाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. 
हिरेन यांच्या मृत्यूनंतर लागलीच भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. आता या प्रकरणाचा तपास केंद्राने आपल्याकडे घेतला तर राज्य सरकारवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न एनआयएच्या माध्यमातून केला जाईल, अशी भीती काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्फोटके सापडणे व हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या परस्परांशी संबंधित घटना असल्यामुळे याचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत व्हायला नको. इतकेच काय, त्यासाठी पोलीस उपायुक्त पातळीवरील अधिकारी एकच हवा, असे मत एकेकाळी ठाणे, मुंबईतील गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेल्या एका वरिष्ठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.  याच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील टीमने ठाणे, मुंबईतील सुरेश मंचेकर, छोटा राजन आणि छोटा शकील या गँगस्टर्सच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या होत्या. 

स्फोटकांच्या मोटारीचा तपास एनआयएकडे जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, तर सुरुवातीपासूनच हा तपास एनआयएकडे दिला जावा, असा आग्रह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. दरम्यान, हा संपूर्ण तपास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एटीएसकडे सोपविला.  मोटारीचे मालक हिरेन यांच्या गूढ मृत्यूवरून राजकारण चांगलेच तापले. मनसुख यांचा नाहक बळी गेल्यामुळे कुटुंबीयांच्या मागणीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणे पोलिसांकडून एटीएसकडे सोपविण्यात आला. कदाचित हा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  दोन्ही यंत्रणांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. 

‘मृत्यूचे कारण उघड होणार नाही’
स्फोटक प्रकरण व हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणावरून राज्य व केंद्र सरकार समोरासमोर उभे ठाकले तर हिरेन यांच्या मृत्यूचे खरे कारण कधीच उघड होणार नाही. कुरघोडीच्या राजकारणात या विषयावरून राजकारण होईल, अशी शंका हिरेन यांचे नातलग व्यक्त करतात.

Web Title: Signs of Mansukh Hiren murder case getting political color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.