बेकायदा बांधकामांविरोधात मूकमोर्चा; लहान मुलेही झाली सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:12 AM2019-07-23T01:12:35+5:302019-07-23T01:12:44+5:30
आरजी जागेवरील बांधकामे हटवा : लोकप्रतिनिधींवर टीका
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीपार्कमधील आमच्या हक्काच्या आरजी जागेतील अतिक्र मणे तोडून जागा मोकळी करून द्या. बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे आमदार व स्थानिक नगरसेवकांनी बंद करावे, अशी मागणी करत रहिवाशांनी रविवारी सायंकाळी मूकमोर्चा काढला होता. यामध्ये लहान मुले, तसेच वृद्धही सहभागी झाले होते.
युनिक गार्डन येथून मूकमोर्चास सुरुवात झाली. आरजीच्या जागेत फिरून मग झेवियर्स शाळा ते गोकुळ व्हिलेज, शांतीपार्क, बँक आॅफ इंडिया येथून फिरून पुन्हा आरजीच्या जागेजवळ मूकमोर्चाचा समारोप झाला. यावेळी मीरा रोड पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
शांतिपार्कच्या गोकुळ व्हिलेजमधील १२ इमारतींलगतच्या आरजी जागेमध्ये भले मोठे प्रवेशद्वार, मोठे शेड तसेच मोठी बांधकामे बेकायदा बांधलेली आहेत. ही बांधकामे पालिकेने बेकायदा ठरवूनही तोडक कारवाई केलेली नाही. तर रहिवाशांच्या सततचा पाठपुरावा आणि आंदोलनांमुळे आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही बेकायदा बांधकाम तोडण्याचे पत्र दिले होते. पण, ते केवळ कागदी घोडेच ठरले असून स्थानिक आमदार आणि नगरसेवक या बांधकामांना संरक्षण देत असल्याने त्यांचाही निषेध रहिवाशांनी केला.
त्यांच्या हातात फलक होते. आमदार व स्थानिक नगरसेवकांनो आमच्या आरजी जागेतील बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे बंद करा, असे फलकांवर लिहिले होते. आरजी जागा मोकळी करून उद्यान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा रहिवाशांना दिला आहे. दरम्यान, शनिवारच्या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याचे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कारवाईलाही टाळाटाळ होण्याची शक्यता आहे.