मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने
By सुरेश लोखंडे | Published: July 25, 2023 06:24 PM2023-07-25T18:24:19+5:302023-07-25T18:24:49+5:30
मणीपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे.
ठाणे : मणीपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात मूक निदर्शने करून या घटनेचा निषेध केला.
मणीपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातूनच कुकी या आदिवासी जमातीमधील दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुप्पी साधली असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी हे निदर्शने केली. ठाणे-पालघर विभागिय अध्यक्षा ऋता आव्हाड , जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग, ठाणे शहर कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ही मुक निदर्शने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली. या आंदोलनात तोंडाला काळ्या फिती बांधून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की,मणीपूरमधील घटना ही फक्त दोन महिलांशी संबधित नाही, तर समस्त समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. त्यामुळे नैतीकता असेल तर केंद्र सरकारने पायउतार व्हावे,अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी घाग यांनी सांगितले की, मणीपूरची घटना सत्तर दिवस दाबून ठेवणार्या केंद्र सरकारचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे. दिवसाढवळ्या दोन भगिनींची नग्न धिंड काढली जात असेल तर मोदींना पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. अर्बन सेलच्या अध्यक्षा रचना वैद्य यांनी, ज्या देशात दगडमातीच्या मूर्ती पुजल्या जातात. त्याच देशात हाडामांसाच्या बाईला नग्न करून धिंड काढली जात असेल तर ते भारत नावाच्या देशाला भूषणावह नक्कीच नाही. मणीपूरमधील अत्याचार दोन महिलांवर नसून समस्त बाई नावाच्या जातीवर आहे, अशी टीका त्यांनी केली. तर युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांनी, असे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. याचा विचार करून जनतेला पेटून उठावे लागेल. नाहीतर ज्या प्रमाणे ज्यूंच्या कत्तली झाल्या होत्या. तशा कत्तली आपल्याही होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. .
या आंदोलनात विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, हाॅकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, असंघटीत कामगार सेलचे राजू चापले, प्रियांका सोनार, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, कांता गजमल, माधुरी सोनार, अनिता मोटे, हाजीबेगम शेख, ज्योती निंबर्गी, रेश्मा भानुशाली, मल्लिका पिल्ले, वनिता भोर, रेश्मा सय्यद, बालिका खैरे, कमरजा मुलानी, सुजाता गवळी, प्रियांका रोकडे, शितल कुडाळकर, लक्ष्मी पवार, रेणू अलगुडे, विजया दामले, शुभांगी कोळपकर, शैलेजा पवार, वंदना हंडोरे, आरती धारकर, लता धारकर, विमल लोध, करिश्मा लोध, माधुरी मिसाळ, रंजना पावडे, सुजाता कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.