ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात मूक निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 11:49 PM2017-09-06T23:49:34+5:302017-09-06T23:50:37+5:30
बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध म्हणून ठाण्यात मुक निदर्शने संध्याकाळी करण्यात आली.
ठाणे , दि. 6 : बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध म्हणून ठाण्यात मुक निदर्शने संध्याकाळी करण्यात आली. समाजाला मागे नेणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या विरुद्ध सातत्याने लिखाण करणाऱ्या व सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखणी चालविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार व संपादक विचारवंत गौरी लंकेश यांची काल बंगळूरू मध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली, या घटनेचा ‘स्वराज अभियान’, स्वराज इंडिया, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमिक जनता संघ या संघटनांच्या वतीने ठाणे स्टेशनवर मूक निदर्शने करून या खुनाचा धिक्कार करण्यात आला.
सध्या देशामध्ये जातीयवादी विचाराने थैमान घातलेले असून जो त्याविरुद्ध बोलेल त्याचा आवाज बंद करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप निदर्शने करणा-या संघटनांनी निवेदनाव्दारे केला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकमधील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती.