केडीएमसीवर काढणार मूक मोर्चा, डम्पिंग हटवण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:03 AM2018-03-14T04:03:17+5:302018-03-14T04:03:17+5:30
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचा जीव कोंडला आहे. आगी लागू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने कराव्यात, हे डम्पिंग तातडीने हटवावे, या मागण्यांसाठी आधारवाडी परिसरातील नागरिक डम्पिंग हटाव संघर्ष समितीच्या नावाखाली एकवटले आहेत.
कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचा जीव कोंडला आहे. आगी लागू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने कराव्यात, हे डम्पिंग तातडीने हटवावे, या मागण्यांसाठी आधारवाडी परिसरातील नागरिक डम्पिंग हटाव संघर्ष समितीच्या नावाखाली एकवटले आहेत. या संघर्ष समितीने १९ मार्चला महासभेच्या दिवशी महापालिकेच्या मुख्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
संघर्ष समितीची पहिली सभा सोमवारी रात्री ९ वाजता वासुदेव बळवंत फडके मैदानात झाली. या वेळी डम्पिंग परिसरातील त्रिवेणीधारा, संस्कारधन, देवी विहार, सिल्वर आदी १० पेक्षा जास्त इमारतींमधील रहिवासी, महेश बनकर, विशाल वैद्य, कांचन कुलकर्णी व माजी नगरसेविका मनीषा डोईफोडे उपस्थित होते. डम्पिंगमुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन मोर्चेच्या वेळी महापौर व आयुक्तांना दिले जाणार आहे.
डम्पिंग हटावच्या मुद्यावर सभेदरम्यान चर्चा झाली. या वेळी अनेकांनी विविध मुद्दे मांडले. आग लागण्यामागील खरे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, आग कचºयाच्या ढिगाºयाखाली मिथेन वायू तयार झाल्याने लागते, असे अग्निशमन दलाचे म्हणणे असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. प्रत्यक्षात आग मिथेन वायूमुळे लागत नाही. तर ती अन्य कोणाकडून तरी लावली जाते, अशी माहिती अग्निशमन दलाने खाजगीत सांगितल्याचे नागरिकांनी या वेळी स्पष्ट केले. आग विझविण्याची निविदा मिळावी, यासाठी आगी लावल्या जातात. एका विशिष्ट व्यक्तीलाच हे काम कसे मिळते, असा प्रश्न कुलकर्णी यांनी केला.
नागरिकांनी सांगितले की, डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे आदेश असताना त्याची कार्यवाही का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. घनकचराप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात व राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यातून अद्याप काहीच साध्य झालेले नाही. तरीही सर्व नागरिकांनी मिळून समितीद्वारे कायदेशीर नोटीस महापालिकेस पाठवली पाहिजे. त्यासाठी एक मसुदा तयार केला पाहिजे, असा मुद्दा काहींनी उपस्थित केला. त्यासाठी ज्येष्ठ वकील अॅड शांताराम दातार यांची मदत घ्यावी, असे सूचवण्यात आले. पण यापूर्वी कायदेशीर लढा देऊनही काही साध्य झालेले नाही. त्यामुळे पुन्हा कायदेशीर लढा लढायचा का, अशी शंका उपस्थित करण्यात आली.
कचºयात भले मोठे राजकारण आहे. कचºयाच्या गाड्या, कचरा उचलणे या निविदांमध्ये स्थानिक राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधी यांना टक्केवारीचा मलिदा मिळतो. त्यामुळे त्यांना हा प्रश्न कायमचा सुटावा, असे वाटत नाही. अधिकारी वर्गही त्याला सामील आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कचºयाची समस्या सोडवण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यात कहर म्हणजे आयुक्तांनी उपाययोजना करण्याऐवजी दम्याचा त्रास असणाºया रुग्णांना घर सोडून अन्यत्र राहायला जा, असे सांगणे आहे. प्रशासन व आयुक्त यांच्याकडून त्यांच्या वक्तव्याविषयी सरावासारव केली जात आहे, असे नागरिकांनी सांगितले. आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली पाहिजे.
आग आपोआप लागत असेल तर मार्चमध्ये ही स्थिती आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आगीचे प्रमाण वाढू शकते. प्रशासनाकडे अल्प आणि दीर्घ काळासाठी काय उपाययोजना आहे, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ डम्पिंग बंद करण्यासाठी आग्रही नाही. महापालिकेविरोधात या मंडळाने एकही कारवाई केलेली नाही. आगीच्या धुरामुळे शहरातील वातावरणही प्रदूषित झाले. डम्पिंगशेजारील झाडेही होरपळून निघाली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेडलाइन, कालबद्ध कार्यक्रम आहे की नाही. त्याची पूर्तता केली जात नसेल तर पालिकेविरोधात प्रदूषणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने हात का आखडता घेतला आहे, यावरही चर्चा झाली.
ग्रामस्थांचा मदतीचा हात :आग विझविण्यासाठी डम्पिंगकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. रस्त्यासाठी वाडघरमधील नागरिक खंडू भोईर व गिरीश भोईर यांनी त्यांची जागा दिली आहे. रस्ता तात्पुरता तयार झाल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या व टँकर त्या मार्गे जात आहेत. तसेच स्थानिक नागरिकही अग्निशमन व महापालिका प्रशासनास आग विझवण्यासाठी मदत करत आहेत. आग विझवताना जळालेल्या कचºयातून काही घनरूपी कचरा गोळा करण्यासाठी कचरा वेचकांचीही गर्दी होत आहे. त्यामुळे कामात अडथळा येत आहे.
विधान परिषदेत अडीच तासाची चर्चा होणार : डम्पिंग ग्राउंडच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात तसेच डम्पिंग ते बंद करून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात महापालिका प्रशासनाची दिरंगाई होत आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार सभापती रामराजे निंबाळकर अडीच तास चर्चा करण्यास मान्यता दिली आहे.
चौथ्या दिवशीही धुराचे लोट : आधारवाडी डम्पिंगवर मंगळवारी चौथ्या दिवशीही धुराचे लोट कायम होते. ६ मार्चला खाडीकिनारीनजीक असलेल्या डम्पिंगला आग लागली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे. सलग चौथ्या दिवशीही धूर असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धुमसणाºया डम्पिंगवर अग्निशमन दलाने पाणी मारणे सुरूच आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी धुराचे प्रमाण कमी होते, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.