भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे ठाण्यात मूक आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: August 24, 2024 03:28 PM2024-08-24T15:28:57+5:302024-08-24T15:29:27+5:30
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी ही मूक निदर्शने महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पार पडली.
ठाणे जिल्ह्यातीलबदलापूर येथील सुप्रसिध्द शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आराेप करून या घटनेच्या निषेधार्थ व त्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे आज ताेंडाला काळ्या पट्या बांधून, हातात काळे झेंडे घेत, मौन व्रत धारण करीत मूक निदर्शने करण्यात आली. यामध्ये अन्यही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकत्यांचा समावेश आढळून आला.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, अत्याचार ग्रस्त बालिकांच्या न्यायासाठी ही मूक निदर्शने महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ठाण्यात पार पडली. तलावपाळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज एकत्र येऊन ही मूक निदर्शने केली. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून, हातात काळे झेंडे घेत, मौन व्रत धारण करीत ही मूक निदर्शने आज करण्यात आली. या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, सचिव संतोष केणे, ठाणे काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास देसाई,काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह महिला आघाडी, अन्य पक्ष व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या आंदाेलनात संख्येने सहभागी झाले होते.
या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करीत रेल्वे स्थानकात रेल रोको करून या घटनेतील गुन्हेगारांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यांच्या या आंदाेलनास पाठिंबा देऊन घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाउीच्या सर्व घटक पक्षांसह अन्यही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज ठाण्यात ही मूक निदर्शने करून निषेध व्यक्त केला