जिल्हाभरातील महोत्सवांतून होतेय व्यावसायिकांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:39 AM2019-12-30T00:39:54+5:302019-12-30T00:39:58+5:30
खरेदीसाठी झुंबड; मंदीच्या वातावरणात मोठा दिलासा; गृहोद्योगांना मिळतेय हक्काची बाजारपेठ, ग्राहकांसाठी विविध उत्पादने उपलब्ध
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी केलेला रोजगारनिर्मितीचा दावा फोल ठरला आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि त्यापाठोपाठ जागतिक मंदीची झळ देशातील सर्वच क्षेत्रांना बसली आहे. मंदीचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसत असले तरी ठाणे, डोंबिवली, अंबरनाथमध्ये सध्या भरवलेल्या विविध महोत्सवांतून मोठी उलाढाल होत आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत असल्याने स्टॉलधारक व आयोजकांत समाधानाचे वातावरण आहे. पूर्वीपेक्षा हे उत्पन्न कमी असले तरी सध्या त्यांचा झालेला व्यवसाय पाहता मंदीचा फारसा फटका या महोत्सवांना बसला नसल्याचे चित्र डोंबिवलीत दिसून येत आहे.
पूर्वी गावखेड्यांमधील जत्रा या ग्रामस्थांसाठी करमणुकीची मुख्य साधने असत. तीच काहीशी संकल्पना सध्या शहरात नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान भरवल्या जाणाऱ्या विविध महोत्सवांच्या माध्यमातून रूढ झाली आहे. खरेदीविक्रीचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मनोरंजनाचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हे महोत्सव एक आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. अनेक लहानमोठे उद्योजक, विविध वस्तंूचे व्यापारी, विक्रेते त्याकडे एक संधी म्हणून पाहतात.
डोंबिवलीत दरवर्षी होणाºया महोत्सवांत पाकीटबंद खाद्यपदार्थ, कपडे, उपकरणे, दैनंदिन घरगुती उपयोगी वस्तू, शैक्षणिक वा शिक्षणोपयोगी वस्तू, विमा वा गुंतवणूकविषयक उत्पादने, वाहने, गृहप्रकल्प आदींचे स्टॉल्स असतात. तसेच येथे सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत असतात. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी त्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळते. संपूर्ण कुटुंब एकाच वेळी खरेदी आणि करमणुकीचा आनंद येथे घेतात. महोत्सवांच्या आकर्षणामुळे यंदाच्या वर्षी त्याला नागरिकांचा प्रतिसाद १५ ते २० टक्क्यांनी वाढला आहे. स्टॉलधारकांना भाडे मोजावे लागत असले, तरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येथे येत असल्याने एक मोठी बाजारपेठ त्यांना मिळते. जणूकाही हा महोत्सव म्हणजे छोटा मॉलच आहे. स्टॉलधारकांचा चांगल्यापैकी व्यवसाय होत असल्याने ते पुढील वर्षीचे आपल्या स्टॉलचे बुकिंगही लगेच करायचा प्रयत्न करतात.
दहा वर्षांपासून न चुकता महोत्सवात येणारे स्टॉलधारकही आहेत, अशी माहिती एका महोत्सवाचे आयोजक विश्वास पुराणिक यांनी दिली. तर, आगरी महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे म्हणाले, महोत्सवाला आर्थिक मंदीची झळ जाणवली नाही. एकाच ठिकाणी लोकांना सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यामुळे लोक त्या खरेदी करतात. काही वस्तू केवळ या महोत्सवातच मिळतात. आगरी खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखता येते. आगरी महोत्सव आता सर्वसमावेशक होऊ लागला आहे. त्यामुळे आगरी समाजाव्यतिरिक्त महोत्सवाला येणारा वर्गही आगरी जेवणाची चव चाखतात. मांडे हा पदार्थ महोत्सवातच नागिरकांना मिळेल.
व्यवसायासाठी एक पर्वणीच स्टॉलधारक चिराग सूचक यांनी सांगितले, आम्ही १६ वर्षांपासून महोत्सवात स्टॉल लावत आहोत. पूर्वी एक स्टॉल लावत होतो. आता तीन स्टॉल लावतो. पूर्वी आम्हाला ३० ते ४० हजारांचा फायदा होत होता. मात्र, आता तो १५ ते २० हजार रुपयांवर आला आहे. पण, आता स्टॉलची संख्याही वाढविली आहे. दुकानात आम्हाला आठ दिवसांत १५ ते २० हजार रुपयांचा फायदा होत नाही. त्यामुळे महोत्सव आमच्यासाठी एक पर्वणीच आहे, असे म्हणावे लागेल.