एकाचवेळी ११२ महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयातून ९२ अधिकारी व कर्मचारी निवृत्त
By अजित मांडके | Published: May 31, 2024 05:29 PM2024-05-31T17:29:07+5:302024-05-31T17:30:46+5:30
महापालिकेत मात्र दरमहा सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे.
अजित मांडके, ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात पालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले असताना आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पोलीस सेवेतून देखील तब्बल ९२ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. महापालिकेत मात्र दरमहा सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त होऊ लागली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. यात सफाई कर्मचारी ३१, शिक्षक १७, लिपिक ११, कार्यकारी अभियंता ०५, प्राध्यापक ०२, मुख्याध्यापक ०२ आणि बिगारी, टेक्निशिअन, वाहनचालक, माळी अशा ४४ जणांचा समावेश आहे. महापालिकेचा आकृती बंध मंजुर झाला असला तरी देखील त्याची भरती प्रक्रिया अद्यापही राबविली गेलेली दिसत नाही.
नव्या वर्षात जानेवारी महिन्यात नव्याने सुमारे २५०० नवीन पदे भरली जाणार होती. परंतु आता मे महिना संपला तरी देखील ही पदे भरण्यासाठी महापालिकेला मुहुर्त सापडू शकलेला नाही. तर महापालिका शाळांतून निवृत्त होणाºया शिक्षकांची संख्या वाढत आहे. त्यातही मागील काही वर्षापासून एका एका शिक्षकावर अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. मुख्याध्यापकांची देखील पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.
दुसरीकडे ३१ मे च्या दिवशी पोलीस विभागातील ९२ जण सेवा निवृत्त झाले आहेत. यात सहपोलीस आयुक्त गजानन काब्दुले यांच्यासह पोलीस निरिक्षक ०४, वरीष्ठ पोलीस निरिक्षक ०१, पोलीस उपनिरिक्षक ०७, स्वीस सहाय्यक -०१, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक ३५, सह पोलीस निरिक्षक २६, पोलीस हवालदार १३, पोलीस नाईक ०२, शिपाई ९१, सफाई कामगार ०१ आदींचा त्यात समावेश आहे.