प्राधिकरणाचेच पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:08 AM2018-08-27T04:08:19+5:302018-08-27T04:09:00+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. मात्र, ज्या प्राधिकरणावर ही जबाबदारी आहे

The sin of authority ambarnatha and badalapur News | प्राधिकरणाचेच पाप

प्राधिकरणाचेच पाप

Next

पंकज पाटील

ठाणे - अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. मात्र, ज्या प्राधिकरणावर ही जबाबदारी आहे, त्यानेच नागरिकांची पाण्यासाठी कोंडी केली आहे. वितरणव्यवस्था सुधारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही समस्या कायम आहे. यंदा ही कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून पावसाळ्यातच पाण्यासाठी आंदोेलने करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

धरणात पाणीसाठा कमी असणे, नदीपात्रात पाणी नसणे, ही कारणे पुढे करून पाणीटंचाईचे अवडंबर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी माजवत आहेत. मात्र, पावसाळ्यात ही कारणे देणे अशक्य असल्याची कल्पना असल्याने प्राधिकरणाला आता नागरिकांना उत्तर देणे अवघड जात आहे. धरणे भरली, उल्हास नदी भरून वाहत आहे, अशा स्थितीत शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्राधिकरणाचे अधिकारी आता एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. प्राधिकरण दररोज १०६ दशलक्ष लीटर पाणी उल्हास नदीतून उचलत आहे. या पाण्याचा वापर अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी केला जातो. आवश्यकतेपेक्षा ३० टक्के अतिरिक्त पाणी उचलूनदेखील शहरांसाठी पाणी कमी पडत आहे. अंबरनाथ शहराला सरासरी ४७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. मात्र, अंबरनाथसाठी सरासरी ६० दशलक्ष लीटर पाणी दिले जात आहे. मात्र, तेही कमी पडत आहे. अंबरनाथ शहरात कधी नव्हे ती यंदा पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात नव्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू असतानाही टंचाई आहे. गेल्या वर्षभरापासून अंबरनाथ शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. नगरोत्थानमधून झालेली योजना आजही पूर्ण झालेली नाही. नव्याने आलेल्या अमृत योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. दोन्ही योजना अपूर्ण असल्याने शहरात पाण्याच्या वितरण व्यवस्थेचे नियोजन नाही. कोणाचेच नियंत्रण नसल्याने जीवन प्राधिकरणाचे कार्यालय हे डोकेदुखी झाले आहे.

गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असतानाही त्याचे वितरण करण्याचे काम योग्य प्रकारे केले जात नाही. जुन्या वाहिन्या सुरूच ठेवल्याने पाणीगळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांच्या वर गेले आहे. अनेक जलकुंभ उभे राहिले असले, तरी ते भरण्याची क्षमता असलेले पंप अजूनही सुरू झालेले नाहीत. पाणीपुरवठा सुरू केल्यावर तो नियंत्रित ठेवणारी यंत्रणा शिल्लक राहिलेली नाही. पाण्याचे योग्य वितरण करण्यासाठी जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह आॅपरेटिंग योग्य प्रकारे करण्याची गरज आहे. मात्र, राजकीय दबावामुळे मर्जीतल्या ठिकाणी जास्तीचे पाणी पोहोचवण्याचे काम प्राधिकरणाचे अधिकारी करत आहेत. लांब पल्ल्यांच्या ठिकाणी पाणीपुरवठा करणे गरजेचे असतानाही अगोदर जलकुंभाजवळील भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
अंबरनाथमध्ये जे पाण्याचे हाल सुरू आहेत, तेच हाल बदलापुरातही सुरू आहेत. या ठिकाणीदेखील अतिरिक्त पाणी उचलण्यात येत असले तरी वितरणव्यवस्थेतील त्रुटींचा फटका बदलापूरकरांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे ते बदलापुरात पाण्यासाठी नागरिकांचा मोठा मोर्चा निघाला. बदलापुरात विजेची समस्या मोठी असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यावर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा ठप्प होते. परिणामी, समस्येत आणखीनच वाढ झाली आहे. बदलापुरात नव्या इमारतींना नळजोडणी लागलीच दिली जात असल्याने जुन्या इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळजोडणी सुरू झाल्याने प्राधिकरणाचे अधिकारी नव्या जोडण्या देण्यातच व्यस्त आहेत. पाण्याच्या वितरणव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप वाढल्याने अधिकारी त्यांच्या आहारी जाऊन पाणीपुरवठा करत आहेत.
 

Web Title: The sin of authority ambarnatha and badalapur News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.