उल्हासनगरच्या राजकारणात पुन्हा सिंधी कार्ड
By Admin | Published: December 31, 2016 03:47 AM2016-12-31T03:47:27+5:302016-12-31T03:47:27+5:30
ओमी कलानी टीमच्या झंझावाताचा धसका घेत उल्हासनगरात पुन्हा सिंधी भाषक राजकारणाने उचल खाल्ली असून एरवी मराठीचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही महापौरपदासाठी
उल्हासनगर : ओमी कलानी टीमच्या झंझावाताचा धसका घेत उल्हासनगरात पुन्हा सिंधी भाषक राजकारणाने उचल खाल्ली असून एरवी मराठीचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही महापौरपदासाठी सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामधील मराठी भाषक नगरसेवकांत नाराजी परसली आहे. भाजपाने बंडखोरांना चुचकारत शिवसेना, रिपाइंसोबत युतीची चर्चा सुरू ठेवली आहे. आठवडाभरात जागावाटप पूर्ण करून प्रचाराला लागायचे, तरच ओमी टीमला टक्कर देता येईल, अशी त्यांची रणनीती आहे.
ओमी कलानी यांचा भर सिंधीभाषक राजकारणावर आहे. त्यासाठी त्यांची आधीपासून तयारी सुरू आहे. सिंधी अस्मिता आणि गेल्या दहा वर्षांत उल्हासनगरात न झालेली विकासकामे हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असेल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पुढे करून विकासाच्या पॅकेजची, योजनांची घोषणा करायची. अगदी उल्हासनगरात मेट्रो आणण्याचे आश्वासन द्यायचे आणि दहा वर्षांतील अकार्यक्षम कारभारावरील लक्ष दुसरीकडे वळवायचे. त्याचवेळी सिंधीभाषक व्यक्तीला महापौरपद देण्याची घोषणा करून त्या भाषकांची एकगठ्ठा मते ओमी यांच्या पारड्यात पडणार नाहीत, अशी व्यूहरचना सुरू आहे. सुरूवातीला शिवसेनेशी युतीबाबत भाजापाचे स्थानिक नेते फारसे अनुकूल नव्हते. त्यामुळे शिवसेनेने परस्पर रिपाइंशी वाटाघाटी सुरू केल्या. भाजापामुळे मंत्रीपद मिळालेल्या आठवलेंनी लगोलग आपल्या नेत्यांना समज देत भाजपासोबत जाण्याचे आदेश दिले. मात्र शिवसेनेचा पवित्रा पाहून भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही नमते घेत युतीच्या वाटाघाटी सुरू केल्या.
उल्हासनगरमधील युतीत रिपाइं सोबत असल्याने भाजपा मोठा भाऊ आहे. गेल्यावेळी प्रत्येकी ३३ जागा वाटून घेणाऱ्या शिवसेना-भाजपाला चार प्रभागांचा एक प्रभाग असलेल्या स्थितीत जागांच्या वाटणीवर तोडगा काढावा लागेल. शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी आहे, भाजपाकडे आर्थिक आणि भाषक ताकद मोठी असल्याचा त्यांच्या नेत्यांचा दावा आहे.
सद्यस्थितीत साई पक्ष ओमी कलानी यांच्या सोबत आहे. गेले सहा महिने शिस्तबद्ध रितीने कलानी यांचे काम सुरू आहे. त्यांना अडवायचे असेल, तर सिंधी कार्डाचे राजकारण खेळण्याचा पर्याय भाजपा-शिवसेनेपुढे आहे. भाजपा नगरसेविका जया मखिजा, हरेश जग्यासी, महेश सुखरामानी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, राम चार्ली यांचे प्रभाग सिंधीबहुल असून त्यावर ओमी कलानी यांची पकड आहे. त्यामुळेच भाजपाने सिंधी कार्ड हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)
सिंधी समाजाला प्राधान्य
महायुतीची ८० टक्के बोलणी झाली आहेत. जागावाटप आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. उल्हासनगरवर भाजपाचाच महापौर असेल, असे ते म्हणाले; तर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही महापौरपदासाठी सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सिंधी समाजातील तरूणांना तिकिट देऊन शिवसेना त्यांना जिंकून आणेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मागील युतीत भाजपा-शिवसेनेच्या जागा समान, पण यश निम्मेच
गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा व रिपाइंची युती झाली. तेव्हाच्या ७८ जागांपैकी सेना-भाजपाला प्रत्येकी ३३, तर १२ जागा रिपाइंच्या आठवले गटाला दिल्या होत्या. शिवसेनेचे-२०, रिपाइंचे-चार; तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे बंडखोर राजा वानखडे, सुनील सुर्वे, विजय पाटील अपक्ष म्हणून निवडून आले होते.
सत्तेसाठी साई पक्षाने पाठिंबा देत आशा इदनानी यांच्या रूपाने महापौरपद पदरात पाडून घेतले होते. महायुतीच्या १० वर्षाच्यार् काळात भाजपाला महापौरपद न मिळाल्याने यावेळी भाजपाचाच महापौर असेल, असा नारा पक्षाने दिला आहे; तर सिंधी समाजाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्या पक्षात सिंधी-मराठी वाद उफाळण्याची शक्यता आहे.