सिंधी राजकारणात सेना तोंडघशी, साईच्या फुटीर गटाकडून विश्वासघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:42 AM2018-09-29T04:42:12+5:302018-09-29T04:44:25+5:30
उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले. साई पक्षाच्या फुटीर गटाने केलेल्या विश्वासघातामुळे शिवसेनेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेसोबत गेले एक दशक सत्तेत असलेल्या भाजपाने महापालिका निवडणुकीत ओमी टीमसोबत आघाडी केली. भाजपा-ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन सत्तेसाठी स्थानिक साई पक्षासोबत हातमिळवणी केली. एकेकाळी कलानी कुटुंबाविरोधात गरळ ओकणारी भाजपा कलानीमय झाली. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे एकही संधी सोडत नाही. महापौर निवडणुकीनिमित्त ही संधी शिवसेनेकडे पुन्हा एकदा चालून आली. भाजपा आघाडीतील साई पक्षात उभी फूट पडल्यानंतर फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी शिवसेनेला पाठिंबा मागितला. शिवसेनेने विरोधी पक्षातील इतर गट आपल्यासोबत असल्याचे गृहीत धरून फुटीर गटाला समर्थन दिले.