पंधरा दिवसांत स्वाइनचे ९ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:50 AM2017-07-19T02:50:58+5:302017-07-19T02:50:58+5:30
ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २५ जणांचा बळी गेला आहे. यातील तिघांचा मृत्यू हा जिल्ह्याबाहेर झाला आहे. तसेच स्वाइन फ्लूने बाधीत रूग्णांचा आकडा आतापर्यंत ५०७ वर गेला असून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत ४०८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ७६८ रुग्णांनी स्वाइनसंदर्भात तपासणी केली आहे. त्यातील ६०७ जण स्वाइन फ्लू संशयित म्हणून पुढे आले. या संशयितांपैकी ५०७ जणांना आतापर्यंत स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदाची बाब म्हणजे, यातील ३५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर अजूनही १३४ रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल आहेत.
मृतांचा आकडा २५
आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात २५ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.
कल्याणात ५९ बाधीत रुग्ण
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात स्वाइन फ्लूचे १३४ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याणात ५९ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाण्यात-५७, नवी मुंबईत-१२, मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत ६ रुग्णांचा समावेश आहे.
ठामपानंतर केडीएमसीत रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइनची लागण झालेले सर्वाधिक २८४ रुग्ण ठामपा हद्दीत आढळले आहेत. त्यानंतर केडीएमसीमध्ये १२४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्येही ६६ रुग्ण असून नवी मुंबईत २४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तसेच उल्हासनगरात एकाला त्याची बाधा झाली आहे. दरम्यान, स्वाइनचे प्रमाण वाढते असूनही यावरील लस मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे.
तपासणीत नवी मुंबई आघाडीवर
- १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लू संदर्भात १ लाख २५ हजार ७६८ जणांनी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नवी मुंबईत ७२ हजार ७०९ जणांनी तपासणी केली आहे.
त्यानंतर ठाणे - ४०,५४५, उल्हासनगर-७,००६,मीरा-भार्इंदर- ३,६६९, कल्याण डोंबिवली-९२२ आणि भिवंडीत- ९१७ जणांनी फ्लूची तपासणी केली आहे.