वसंतराव डावखरेंनी केला होता साहित्य संमेलनात लतादीदींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 03:28 PM2022-02-06T15:28:29+5:302022-02-06T15:29:06+5:30
संमेलन भव्य व स्मरणीय करण्याचा ध्यास वसंतराव डावखरेंनी घेतला होता.
स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी ठाण्याला १९८८ मध्ये पहिल्यांदा भेट दिली होती. निमित्त होते, ते तत्कालीन महापौर वसंतराव डावखरे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली झालेल्या ६१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे. प्रख्यात नाटककार वसंत शंकर कानेटकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
संमेलन भव्य व स्मरणीय करण्याचा ध्यास वसंतराव डावखरेंनी घेतला होता. मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच विविध मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली. त्यातून स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनाही निमंत्रित करुन सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वत: वसंतरावांनी भेट घेऊन, त्यांना निमंत्रित केले. ठाणेकरांच्या आमंत्रणाचा लतादीदीनींही सन्मान करून ठाण्यातील साहित्य संमेलनाला भेट दिली होती. त्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. बहूदा ती लता मंगेशकरांनी ठाण्याला दिलेली पहिलीच भेट असावी. त्यानंतर मंगेशकर कुटुंबाबरोबर वसंतराव डावखरेंचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले.
वसंतराव डावखरेंकडून लतादीदींची वाढदिवसानिमित्ताने आवर्जून अभिष्टचिंतन करण्यासाठी भेट घेतली जात होती. लतादीदींच्या निधनानंतर लतादीदी व दिवंगत वसंतराव यांच्याबरोबरच्या भेटीची काही छायाचित्रे आमदार निरंजन वसंतराव डावखरे यांना आज सोशल मिडियावर प्रसिद्ध केली आहेत. १९८८ च्या संमेलनावेळी वसंतरावांची आई दिवंगत सरुबाई, लतादीदी यांचे एकत्रित छायाचित्र आहे.
तसेच २८ सप्टेंबर २००७ रोजी वाढदिवसानिमित्ताने वसंतराव डावखरेंकडून दीदींना रुपेरी वीणा भेट दिले जात असल्याचे छायाचित्रही शेअर केले आहे. या भेटीच्यावेळी ठाण्याचे तत्कालीन महापौर राजन विचारे, तत्कालीन महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांचीही उपस्थिती होती. या छायाचित्राच्या माध्यमातून श्री. जंत्रे यांनीही लतादीदींची आठवण सांगितली. विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यानंतर दिवंगत डावखरेंनी मला लतादीदींच्या अभिष्टचिंतनासाठी सोबत नेले होते. त्यावेळचे काही क्षण माझ्या आजही स्मरणात असल्याचे श्री. जंत्रे यांनी सांगितले.