बुडालेली बोट अखेर किनाऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:29 PM2019-12-17T23:29:50+5:302019-12-17T23:29:54+5:30
११ जण सुखरूप परतले : उत्तनच्या मच्छीमारांनी मदत केल्याने जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : वारा आणि उंच लाटांमुळे रविवारी पहाटे उत्तनच्या किनाºयापासून ३५ किलोमीटर खोल समुद्रात बुडालेली साई लक्ष्मी - ५ ही बोट मच्छीमारांच्या ५ बोटींनी मिळून मंगळवारी रात्री चौक किनाºयाजवळ आणली. बोटीच्या नाखवासह खलाशी मिळून ११ जण सुखरुप असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला असला तरी, बोटीचे मात्र काही लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
साटपाटीच्या अनिल काशिनाथ तांडेल यांची साई लक्ष्मी बोट ही भार्इंदर उत्तन - पातान बंदर येथील मच्छिमार विजय रिचर्ड बगाजी यांनी भाडेतत्वावर मच्छीमारीसाठी घेतली होती. शुक्रवारी विजय हे मच्छीमारीसाठी १० खलाशांना घेऊन समुद्रात गेले होते. एकदा जाळे टाकून मच्छीमारी केल्यानंतर सुमारे ३५ किमी खोल अंतरावर बोट थांबली होती. परंतु समुद्रात सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे मोठ्या लाटा उसळल्याने रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ही बोट उलटली.
भर समुद्रात बोट उलटल्याने विजयसह दहा खलाशी समुद्रात पडले. मिट्ट काळोख आणि जोरदार लाटांमध्येही त्यांनी प्रसंगावधान राखून बोटीवर रिकामे झालेल्या पाण्याच्या ड्रमला धरुन तरंगत राहिले. विजय यांनी दूर दिसत असलेल्या मासेमारी बोटीचे दिवे पाहून, त्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. सुमारे एक ते दिड किमी पोहत जात तेथे असलेली उत्तन भागातील दया सागर ही मच्छिमार बोट त्यांनी गाठली. बोटीवरील नाखवा गिल्बर्ट नेतोघर यांना आपली बोट बुडाली असून १० खलाशी समुद्रात असल्याने त्यांना वाचवण्याची विनंती केली.
गिल्बर्ट यांनी मच्छीमारीसाठी जाळी टाकण्याचे काम थांबवून तातडीने बोट बुडाली होती त्या दिशेला आपली बोट नेली. समुद्रात तरंगत असलेल्या खलाशांना बोटीवर घेऊन सर्वांचे जीव वाचवले. दयासागरसह आजुबाजुला असलेल्या यशस्वी, एंजल आदी बोटींनीदेखील मदतीसाठी धाव घेतली. नंतर ही माहिती विजय यांच्या घरी तसेच अन्य मच्छीमारांना देण्यात आली. बुडालेली बोट व त्यावरील ११ जणांना किनाºयावर आणण्यासाठी उत्तन भागातून मॉर्निंग स्टार, अनोख, डोर्मिशन, योसेफा, शास्त्रलेख या बोटी समुद्रात रवाना झाल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी बुडालेली बोट व त्यावरील नाखवा आणि खलाशांना घेऊन पाचही बोटी भार्इंदरच्या चौक येथील धक्क्याजवळ समुद्रात आल्या. उशिरापर्यंत ही बोट किनारी आणण्याचे प्रयत्न सुरु होते.