ठाण्यात सिरो सर्व्हे विचाराधीन; पालिकेची दिवाळीनंतर मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 11:55 PM2020-11-12T23:55:27+5:302020-11-12T23:55:39+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४७ हजार ९९८ रुग्ण आढळले आहेत.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शहरात ॲण्टीबॉडीजचे प्रमाण किती टक्के आहे, हे तपासण्यासाठी आता दिवाळीनंतर ठाण्यात सिरो सर्व्हे करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. मुंबईमध्ये ज्या संस्थेने हा सर्व्हे केला आहे, तिच्याच माध्यमातून तो करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही महत्त्वाच्या तीन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा सर्व्हे केला जाणार असून यासाठी सर्वाधिक रुग्ण ज्या प्रभागात आढळले, त्याच प्रभागात तो होण्याची शक्यता असून यामुळे शहरात ॲण्टीबॉडीजचे प्रमाण किती टक्के आहे, याचा अंदाज येणार आहे.महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ९४ टक्क्यांंहून अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असून शहरात सध्या सव्वातीन टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने मृत्युदर कमी होऊन २.३२ टक्के इतका झाला आहे. याशिवाय, रुग्णदुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर पोहोचला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४७ हजार ९९८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४५ हजार ३७२ (९४.५३ टक्के) रुग्ण बरे झाले असून एक हजार ५११ (३.१५ टक्के) रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत एक हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण २.३२ टक्के आहे. ठाणे शहरात दररोज साडेपाच ते सहा हजारांच्या आसपास कोरोना चाचण्या होत असून त्यामध्ये यापूर्वी दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता चाचण्या तितक्याच केल्या जात असतानाही रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून आता दररोज १२५ ते १५० रुग्ण आढळून येत आहेत.