भावाकडून बहिणीची लैंगिक छळवणूक
By admin | Published: June 11, 2017 02:30 AM2017-06-11T02:30:43+5:302017-06-11T02:30:43+5:30
बहिणीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या सख्ख्या भावाला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याशी हे चाळे करीत असल्याची
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बहिणीची लैंगिक छळवणूक करणाऱ्या सख्ख्या भावाला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याशी हे चाळे करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असतानाच किसननगर भागात एक १९ वर्षीय मुलगा त्याच्याच सख्ख्या बहिणीचा वारंवार विनयभंग करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलुंडच्या एका संगणकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये ही १७ वर्षीय मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षणाला जात होती. नेहमी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून तेथील महिला सचिवाला काहीशी शंका आल्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. ही सचिव महिला आधी तिच्या घराजवळ वास्तव्याला असल्यामुळे त्यांची तिच्याशी चांगली ओळखही होती. त्यामुळेच तिने त्यांच्याकडे अखेर आपले मन मोकळे केले. त्या वेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. घरात कोणी नसताना भाऊ तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. कधीकधी तर तो तिला मोबाइलवरील अश्लील क्लिपिंग दाखवूनही तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असे. या संपूर्ण प्रकाराची माहिती प्रशिक्षण केंद्रातील संचालक आणि सचिवांच्या मदतीने तिने श्रीनगर पोलिसांना सांगितली. याबाबत, ९ जून रोजी रात्री ९ वा. गुन्हा दाखल होताच अवघ्या तासाभरातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी त्याला अटक केली आहे.
पालकांनी लक्ष द्यावे
आपला मुलगा किंवा मुलगी काय करतात, त्यांच्याकडील मोबाइल आणि नेटचा ते योग्य कामासाठीच वापर करतात की नाही, याबाबत पालकांनीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. असे प्रकार होणार नाहीत, याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.
- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे