पालघर-डहाणूत परिस्थिती सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:58 AM2020-06-04T00:58:08+5:302020-06-04T00:58:22+5:30
प्रशासन सज्ज : चक्रीवादळाचा संभाव्य इशारा; निवारा केंद्रात पाठविलेले नागरिक घरी परतले
अनिरुद्ध पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणूत चक्रीवादळाचा संभाव्य धोका प्रशासनाकडून देण्यात आला असला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात पाठविण्यात आलेले किनारी भागातील नागरिक घराकडे परतले. दरम्यान, एनडीआरएफ टीम, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यासह तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.
तालुक्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १ जूनपासून एक अधिकारी आणि २१ जवानांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या १३ गावांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या गावांमध्ये भेटी देऊन तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली. या वेळी त्या - त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दवंडी देत ज्या नागरिकांची कच्ची घरे आहेत, त्यांना नजीकच्या शाळांमध्ये तयार केलेल्या निवारा केंद्रांत जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी नरपड, आगर, पारनाका नजीकच्या सतीपाडा वस्तीतील नागरिकांना निवारा केंद्रांत हलविले.
बुधवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत वादळसदृश स्थिती होती. साडेबारा वाजल्यानंतर कमी वेगाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, सायंकाळी परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रांतील नागरिकांनी घर गाठले. वीजपुरवठाही अखंडित सुरू होता. डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गालगत धोकादायक वृक्ष छाटण्याचे काम वन विभागाने हाती घेतले होते. प्रशासनाचे अधिकारी किनाºयालगतच्या गावांमध्ये राहून परिस्थितीवर नजर ठेवून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून वाºयाचा वेगही सामान्य होता, असे ते म्हणाले.
जिल्हा प्रशासनाला नगरपालिका क्षेत्रासह किनाºयालगतच्या १३ गावांची संभाव्य माहिती देण्यात आली होती. त्यांच्याकडून डहाणू, नरपड आणि चिखले या गावांना संभाव्य धोका सांगण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता डहाणू शहरातील सर्व दुकाने, कारखाने बंद करण्यात आले होते.
आगरच्या दुबळापाडा या किनाºयालगत वस्तीतील कच्च्या घरांत राहणाºया शंभर नागरिकांना नजीकच्या बंगल्यात आणि वसतिगृहात हलविण्यात आले. मात्र परिस्थिती सामान्य असल्याने ते पुन्हा घराकडे परतले.
- संजय पाटील/संदेश पाटील (निवारा केंद्रात मदत करणारे)
तालुक्याला चक्रीवादळाचा संभाव्य इशारा देण्यात आला असला, तरी दिवसभर परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात गेलेले नागरिक घराकडे परतले असून दिवसभर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक हालचालींवर प्रशासनाचे लक्ष असून ते सज्ज आहेत.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू