टिटवाळा मंदिर मुख्य रोडवरील साकव पुल पाण्याखाली; रहिवाश्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 04:36 PM2019-08-04T16:36:23+5:302019-08-04T16:42:45+5:30
सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
ठाणे: सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातच टिटवाळा रेल्वे स्थानकांपासून ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिर जवळच्या साकव पुलावर पाच ते सहा फुट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे हाल झाले आहे. तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे.
त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने येथील नारायण नगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील 25 घरे पाण्याखाली आहेत. तर सांडोडा रोड येथील 200 घरं पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच रिजन्स सर्वम या सोसायटीत देखील पाणी शिरल्याने येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. सदर सोसायटीच्या काही इमारती व क्लब हाऊस हे या नाल्याच्या कडेला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे येथील रहिवासी यांनी सांगितले.
टिटवाळा स्थानकातील रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिस, नागरिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते लोकांना मदतीचा हात देतांना दिसत आहेत. येथील विनायक काळण व गजानन काळण यांनी आपल्याकडील होड्या देऊन लोकांना येण्या-जाण्यासाठी मदत केली आहे. सध्या पावसाचा जोर अजूनच वाढला असल्याने व बारावी धरणाचे पाणी सोडल्याने आणखी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. लोकांनी काम नसेल तर घराबाहेर पडू नये असे आव्हान प्रशासनाकडून पूरसदृश परिस्थितीच्या ठिकाणी केली लोकांना केले जात आहे.
टिटवाळा गणपती मंदिराच्या मुख्य रस्त्यावर काळू नदीचे पाणी शिरले pic.twitter.com/e0OzXqj18q
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2019
पुराचं पाणी बघण्यासाठी बघ्यांची गर्दी देखील दिसून येत आहे. पूरसदृश्य परिस्थिती अडकलेल्या नागरिकांना येथील विद्या मंदिर शाळेत हलवण्यात आले असून या हजारो नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक नगरसेविका उपमहापौर भोईर यांनी केली आहे.