ठाणे जि.प.च्या सहा जागांसाठी १६३७ अर्ज; लेखी परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 04:33 AM2020-01-11T04:33:39+5:302020-01-11T04:33:42+5:30
सेवारत कर्मचाऱ्यांची जातपडताळणी न झाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत रिक्त झालेली सहा पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
ठाणे : सेवारत कर्मचाऱ्यांची जातपडताळणी न झाल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत रिक्त झालेली सहा पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी एक हजार ६३७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांच्या परीक्षा शुक्रवार आणि शनिवारी होणार होत्या. मात्र, आता ही परीक्षा २३ जानेवारी रोजी घेतली जाणार
आहे.
ठाणे जिल्हा परिषदेने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये कनिष्ठ सहायक, कृषी विस्तार अधिकारी, महिला आरोग्यसेवक, स्थापत्य-बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आदी पदांची लेखी परीक्षा शुक्रवार आणि शनिवारी
घेतली जाणार होती. पण, आता या लेखी परीक्षेची तारीख अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यानुसार, २३ जानेवारी रोजी ही परीक्षा घेतली जाणार असल्याची नोंद संबंधित उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी ९स्र३ँंल्ली.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. संकेतस्थळवरील सुचनाकंडे उमेदवारांनी लक्ष ठेवण्यासाठीही सुचवले आहे.