अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १४ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:01 AM2019-07-25T01:01:21+5:302019-07-25T01:01:36+5:30
दोन महिन्यांतील कारवाई : जनजागृतीसाठीही पोलिसांची मोहीम, २८ लाखांचा माल हस्तगत
ठाणे : अमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच वाहतूक करणाºया १४ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन महिन्यांमध्ये अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख ६५ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विक्री तसेच हे पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्धची मोहीम तीव्र केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाºया तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाºया २७१ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ५५ हजारांचा दंडही वसूल केला आहे. सध्या तरुणांमध्ये प्रचलित असलेल्या एनएसडी या अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाबाबत या पथकाने गोपनीय माहिती मिळवून त्याची विक्री करणाºयांविरुद्ध जून महिन्यात कारवाई केली.
याशिवाय, अमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून १४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख ६५ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शाळा महाविद्यालयांमध्ये जागृती
तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, म्हणून केवळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यापेक्षा शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
अशा पदार्थांची विक्री आणि सेवन करणाºयांची माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असा विश्वासही त्यांच्यात निर्माण केला जातो. अमली पदार्थांची तस्करी करणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जात असल्याचे पोवार यांनी सांगितले. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात १०० मीटरच्या आत आणि सार्वजनिक ठिकाणी विक्री तथा सेवन करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.