सहा दिवसांत सहा डॉक्टरांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:22 AM2018-12-21T05:22:13+5:302018-12-21T05:22:28+5:30

केडीएमसी रुग्णालये : सोयीसुविधांच्या अभावामुळे निर्णय, राजीनामे मंजूर नाही, पालिकेच्या महासभेत चर्चा

Six doctors resign in six days | सहा दिवसांत सहा डॉक्टरांनी दिले राजीनामे

सहा दिवसांत सहा डॉक्टरांनी दिले राजीनामे

Next

कल्याण : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांतील सहा डॉक्टरांनी सहा दिवसांत राजीनामे दिल्याची धक्कादायक बाब गुरुवारी महापालिकेच्या महासभेत उघड झाली. रुग्णांना आरोग्यसेवा योग्य प्रकारे मिळत नसतानाच आता डॉक्टरांनीही सोयीसुविधा मिळत नसल्याचे कारण देत सामूहिक राजीनामा दिले आहेत. आता तरी महापालिका काही बोध घेणार का, असा खोचक सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी केला आहे.

महापालिका रुग्णालयांतून योग्य प्रकारे आरोग्यसेवा दिली जात नसल्याची बाब सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले यांनी मांडली. भाजपा नगरसेविका डॉ. सुनीता पाटील म्हणाल्या, ‘महापालिकेच्या रुग्णालयात एकच स्त्रीरोगतज्ज्ञ आहे, तर बालरोगतज्ज्ञही नाही. त्यामुळे महिलांची आबाळ होते. पुढील उपचारासाठी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले जाते.’ तर, ‘महापालिकेचा आरोग्य विभाग महिलांच्या जीवाशी खेळत आहे’, अशी टीका शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे यांनी केली.
शिवसेना सदस्य विश्वनाथ राणे म्हणाले, महापालिकेच्या रुग्णालयांत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याने ही रुग्णालये सेवाभावी संस्था अथवा पीपीपी तत्त्वावर चालवण्यास दिल्यास नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळू शकते.’ तर, ‘सहा डॉक्टरांनी सहा दिवसांत राजीनामा दिला, ही बाब सत्य आहे’ का असा सवाल शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केला असता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजीव लवंगारे यांनी राजीनामा दिल्याचे मान्य केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्यसेवेविषयी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी उपस्थित केला.

आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, महापालिकेकडून ४५ डॉक्टरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होईपर्यंत प्रतिनियुक्तीवर वैद्यकीय अधिकारी महापालिका रुग्णालयांना पुरवावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, महापालिकेची रुग्णालये योग्य प्रकारे आरोग्यसेवा पुरवण्यात कमी पडत असल्याचे बोडके यांनी मान्य केले.

आरोग्यसेवेवर पडणार ताण
महापालिका रुग्णालयात ११५ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु, ३६ डॉक्टरच कार्यरत आहेत. रुग्णालयात योग्य प्रकारे सोयीसुविधा मिळत नसल्याचे कारण देत त्यातील सहा डॉक्टरांनी सहा दिवसांत राजीनामा दिला आहे. प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला नसला, तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे आरोग्यसेवेवर अधिक ताण पडणार आहे. यापूर्वीही सात डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.

महापालिका दोन्ही रुग्णालयांवर वर्षाला ३० कोटी खर्च करते. मात्र, तरीही सुविधांची वानवा आहे. पॅरामेडिकल आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी कमी आहेत. डॉक्टरांना निदान करण्यासाठी एक्सरे, सोनोग्राफी, अन्य तपासासाठी पॅथालॉजी लॅब नाही.

Web Title: Six doctors resign in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.