जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायती शाश्वत स्वच्छतेसाठी ‘ओडीएफ प्लस’ म्हणून स्वयंम घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:54+5:302021-08-17T04:46:54+5:30
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्तीनंतर स्वच्छता, साफसफाई टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सहा ग्रामपंचायतींनी ...
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्तीनंतर स्वच्छता, साफसफाई टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सहा ग्रामपंचायतींनी १५ ऑगस्ट रोजी ‘ओडीएफ प्लस’ म्हणून स्वयंम घोषित केले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या ओडीएफ प्लस म्हणून घोषित केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मुरबाड तालुक्यातील माल्हेड, कान्होळ, कासगाव या ग्रामपंचायतींसह अंबरनाथ तालुक्यातील बुदुर्ल. भिवंडी तालुक्यातील कुसापूर आणि शहापूरमधील अंदाड, या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा मार्च २०१७ साली हागणदारीमुक्त झाला. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत ग्रामीणअंतर्गत जिल्ह्यात टप्पा क्रमांक २ म्हणजेच ओडीएफ प्लसची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
ओडीएफ प्लसमध्ये वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व त्यांचा वापर करणे. त्याची शाश्वतता राखणे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. गाव नेहमीच स्वच्छ ठेवणे आदीं कामे जिल्ह्यातील या सहा स्वयंमघोषित ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे पूर्तता करून गाव ओडीएफ प्लस केले आहे. याप्रमाणेच सर्व ग्रामपंचायतींनी शाश्वत स्वच्छता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. आपले गाव ओडीएफ प्लस होण्यासाठी सर्व आवश्यक पूर्तता करण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी केले आहे.