पत्रीपुलावर सहा तास वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:29 AM2019-05-19T00:29:36+5:302019-05-19T00:29:42+5:30
एसटी बस बंद पडल्याने फटका । वाहनचालक, प्रवाशांचे झाले हाल
कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडल्याने त्यावरील वाहतूक शेजारील पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने तेथे नेहमी वाहतूककोंडी होते. त्यातच, शनिवारी नेमकी पुलावरच शीळहून कल्याणकडे येणारी एसटी बस बंद पडली. त्यामुळे या पुलावर सहा तास वाहतूककोंडी झाल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला.
कल्याणच्या पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, या कामाला गती नाही. तर, शेजारील अरुंद पुलावर प्लास्टिकचे दुभाजक ठेवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता पुलावरून जाणारी एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे तेथेच बंद पडली. परिणामी, वाहतूककोंडीत आणखी भर पडली.
एसटी बसचालक व वाहक यांनी बस बंद पडल्याची माहिती कल्याण एसटी डेपोला दिली. मात्र, सायंकाळी ५ वाजले तरी बंद पडलेली बस तेथून हलवलेली नव्हती. त्यामुळे बसचालक आणि वाहक हतबल झाले. शिवाय, वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनीही टोइंग व्हॅन मागवली नाही. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी त्यांच्या नावाने शंख केला. दरम्यान, एसटी बसमधील प्रवाशांनाही पत्रीपुलावरून कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागली.
खड्डे आणि प्लास्टिकचे तुटलेले दुभाजक
जुन्या पत्रीपुलाला समांतर असलेल्या पुलाच्या सुरुवातीला काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच प्लास्टिकचे दुभाजक बेशिस्त वाहनचालकांमुळे तुटले आहे. दुभाजकाची लेनही विस्कटली आहे.
च्पुलावरील खड्डे भरणे, दुभाजक नव्याने लावणे, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. हद्दीचा मुद्दा न पाळता महापालिकेकडून खड्डे बुजवले जाणार होते. तसेच पुलावर मास्टिक अस्फाल्टिंग शीट टाकली जाणार होती. मात्र, ती टाकण्यात आलेली नाही.
च्महापालिकेच्या मते राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास १ मे पासूनच सुरुवात केली आहे. मग, या पुलावरील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.