ठाण्यात एकाच रात्रीत सहा घरांमध्ये चोरी: महापौरांच्या बहिणीकडेही चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:53 PM2018-09-26T22:53:48+5:302018-09-26T23:06:15+5:30
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या बहिणीच्या घरासह शहरातील सहा ठिकाणी मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास चोऱ्या झाल्या.या चोºयांच्या सत्रामुळे महापौर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या बहिणीच्या घरासह शहरातील सहा ठिकाणी मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास चो-या झाल्या. याप्रकरणी कापूरबावडी आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच रात्रीमध्ये झालेल्या या चो-यांच्या सत्रामुळे महापौर शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
शिंदे यांची बहीण शोभा आणि मेहुणे प्रसन्न कोटीयन हे मानपाड्यातील स्मशानभूमी रोडवरील कांचनगंगा चाळीत वास्तव्याला आहेत. अलीकडेच त्यांनी घराचे बांधकाम सुरूकेल्यामुळे त्यांचे मोजकेच सामान या घरात होते. ते तात्पुरते जेैन मंदिराजवळील घरामध्ये वास्तव्याला गेले आहेत. कांचनगंगा चाळीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन हजारांची रोकड लंपास केली. याच भागातील शांतिदूत बौद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या संदीप भिंगारदिवे यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याच्या मंगळसूत्रासह एक लाख दोन हजारांचा ऐवज चोरीस गेला. भिंगारदिवे हे मंगळवारी पहाटे घराला कुलूप लावून त्यांच्या अन्य घरात पत्नीसह गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. तिस-या घटनेत शिवाकांत यादव यांच्या घरातूनही मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी १२ हजार ६०० चा ऐवज चोरला. यादव हे घराच्या माळ्यावर झोपले असताना तळ मजल्यावरील दरवाजाची कडी उचकटून चोरी झाली. तिन्ही प्रकरणांत कापूरबावडी पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबरला एकत्रित गुन्हा दाखल झाला आहे. तर, वागळे इस्टेट भागातील ज्ञानेश्वरनगरातील चाळ क्र. २९ मधील आनंदा पाटील यांच्याकडे पाच हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चाळ क्र. ३६ मधील प्रदीप बच्छाव यांच्या घरातून चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली. तर, सोमेश्वर सोसायटीतील बाळा भोईर यांच्या घरातून २५ हजारांची रोकड आणि तीन तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास झाला. या तिन्ही घरातील रहिवासी गावी गेल्याची संधी साधून ही घरे फोडली. याप्रकरणी आता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ज्ञानेश्वरनगर, फुलेनगर भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी भाजपाचे पदाधिकारी कैलास पाटील यांनी केली आहे.
‘‘मानपाड्यात मुख्य सात ठिकाणी १५ दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही बसवले. आम्ही चोरीची तक्रार करणार नव्हतो, पण एकापेक्षा जास्त ठिकाणी चो-या झाल्यामुळे तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे गांभीर्याने घेऊन शहरातील चो-यांचा तपास करणे अपेक्षित आहे.’’
मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे
/>